शाहनवाज हुसेन यांचा दावा
राज्यात भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जातील. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आत्मविश्वास गमावला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पानिपत होईल, असे भाकीत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केले आहे.
राष्ट्रीय एकता अभियान अंतर्गत काश्मीर कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याच्या विषयावर आयोजित व्याख्यानासाठी हुसेन येथे आले होते. भाजपच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आमदार देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, सुनील बागूल आदी यावेळी उपस्थित होते.
भाजप, सेना आणि मित्रपक्षांची युती होईल. महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होतील, असा दावाही त्यांनी केला.
विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीला दोन अंकी पल्ला गाठता येणार नाही. आगामी निवडणूक विकासाच्या मुद्दय़ावर लढविली जाईल. पाच वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. तरुण नेतृत्व म्हणून जनता पुन्हा त्यांना संधी देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते म्हणून पुढे आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील त्यांचे भाषण ऐकून टाळ्या वाजवितात. देशातील मुस्लीम बांधव जेहादला बळी पडले नाहीत. मुस्लीम समुदायाने मोदी यांचे आभार मानले, असा दाखला त्यांनी दिला.