ग्रामीण भागांत भाजपचे बस्तान

जिल्ह्यातील नगर पंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप व शिवसेनेने स्वतंत्रपणे मैदानात उतरूनही काँग्रेस व राष्ट्रवादीला हादरे दिले. कळवण वगळता पाचही नगर पंचायतीत काँग्रेस व राष्ट्रवादीला पराभवाचे धक्के सहन करावे लागले. या निमित्ताने भाजपने ग्रामीण भागात आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप व सेनेला परस्परांचे अथवा अपक्षांचे सहकार्य घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. काँग्रेसची अनेक ठिकाणी दारुण अवस्था झाली. निकालानंतर सुरगाण्यात कार्यकर्त्यांमध्ये वादही झाले.

नगर परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वपक्षीय नेत्यांनी फारसे लक्ष दिले नाही. परंतु, उमेदवारांनी सर्वशक्तीनिशी मैदानात उतरत निवडणूक चुरशीची केली. देवळा नगर परिषदेत १७ जागांसाठी एकूण ६२ उमेदवार रिंगणात होते. जनशक्ती पॅनलच्या सहा जणांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली. उर्वरित सर्व उमेदवारांनी वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढविली. या ठिकाणी भाजपला सर्वाधिक पाच, काँग्रेसला चार, शिवसेना ३, राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि अपक्षांना तीन जागा मिळाल्या. निफाड नगर पंचायतीत सेना व भाजपला समसमान यश मिळाले. १७ जागांसाठी ६६ उमेदवार िरगणात असतांना त्यात ५३ उमेदवार राजकीय पक्षांचे तर १३ अपक्षांना पक्षांनी पुरस्कृत केले. निवडणूक जिंकण्यासाठी मोठय़ा प्रमाणात ‘अर्थकारण’ झाल्याची चर्चा होती. आ. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ५ जागा मिळविल्या. भाजपही या स्पर्धेत मागे राहिली नाही. त्यांना पाच जागा मिळाल्या. काँग्रेसने एक, राष्ट्रवादी काँग्रेस ३, आणि इतर ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले. चांदवडमध्ये १७ जागांसाठी सर्वाधिक म्हणजे ११६ उमेदवार िरगणात होते. या ठिकाणी भाजपचा वरचष्मा राहिला. त्यांनी ५ जागांवर विजय संपादित केला. शिवसेना ३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २ आणि इतर म्हणजे अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले. कळवण नगर पंचायतीत राष्ट्रवादीला आपले वर्चस्व राखण्यात यश मिळाले. जिल्ह्यात ही एकमेव नगर परिषद अशी ठरली, की जिथे विरोधकांनी वर्चस्व राखले. राष्ट्रवादी काँग्रेसला सात, काँग्रेस ३ आणि सेना १, भाजपला ४ तर इतर २ अशा जागा मिळाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरगाणा, पेठ येथील नगर पंचायतीच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसल्याने काही ठिकाणी पक्षाचे तर काही ठिकाणी अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करावी लागणार आहे.

पेठमध्ये शिवसेनेला ८, भाजप १, सीपीएम २, अपक्ष ३, राष्ट्रवादी ३, तर सुरगाण्यात भाजप ७, सेना ५, सीपीएम ५ असे पक्षीय बलाबल असून काँग्रेसला दोन्ही ठिकाणी भोपळाही फोडता आलेला नाही. राष्ट्रवादीला एका ठिकाणी पराभवाचे धनी व्हावे लागले.