जळगाव : जिल्ह्यात महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजविणाऱ्या सैन्याचा गौरव करण्यासाठी ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत. महायुतीच्या पावलावर पाऊल ठेवून आता काँग्रेसने जळगाव जिल्ह्यातील फैजपूरमध्ये तिरंगा वीरस्मरण यात्रा काढली. त्या माध्यमातून राजकीय शक्तीप्रदर्शन करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
विधानसभेच्या निवडणुकीतील मोठ्या यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तिन्ही राजकीय पक्षांमध्ये मोठा उत्साह आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजविणाऱ्या सैन्याचा गौरव करण्यासाठी आयोजित तिरंगा यात्रेच्या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी साधली.
तिरंगा यात्रेत नेत्यांसह मंत्री, खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वच सहभागी होत असल्याने महायुतीत एकजूट कायम असल्याचे त्याद्वारे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्ह्यात महायुती तिरंगा यात्रेतून जोरदार राजकीय शक्तीप्रदर्शन करत असताना, इतके दिवस महाविकास आघाडीने फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र, काँग्रेसने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून बुधवारी फैजपूरमध्ये तिरंगा वीर स्मरण यात्रा काढून कुठेच कमी नसल्याचे दाखवून दिले.
रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी या यात्रेचे नेतृत्व केले. ज्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पार पडले होते, त्या धनाजी नाना महाविद्यालयाच्या आवारातील प्रेरणा स्तंभापासून निघालेल्या तिरंगा यात्रेचा समारोप स्वतंत्रता स्मारकाजवळ झाला. दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सैन्यदलाच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश यात्रेतून देण्यात आला. रावेर-यावल तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग होता.