सत्ताधारी भाजपमध्ये दोन गट; सर्व बाबी तपासण्याचे संकेत; महापुरानंतर पाटबंधारे विभाग सावध
नाशिक : गोदावरीच्या महापुराचा शहरास तडाखा बसून अवघे काही दिवस उलटले असताना पुराचे रूपांतर महापुरात करण्यास कारक ठरलेल्या कारणांमध्ये महापालिका पुन्हा नव्याने भर घालण्याच्या प्रयत्नात आहे. रामवाडी ते आनंदवली या साडेचार किलोमीटरच्या अंतरात गोदावरीवर पाच (अधिक एक लहान आनंदवली) पूल अस्तित्वात असताना त्यात पुन्हा दोन नव्या पुलांची भर सत्ताधारी भाजप घालणार आहे. मात्र नव्या पुलांना परवानगीसाठी पालिकेचा प्रस्ताव आल्यानंतर सर्व बाबी तपासण्याचे संकेत पाटबंधारे विभागाने दिले आहेत.
या आधीच्या पुलांमुळे गोदावरीत मागील बाजूस फुगवटा वाढत असून अतिक्रमणांमुळे गोदावरीची पाणी वाहून नेण्याची क्षमता निम्म्याने घटली आहे. नव्या पुलामुळे फुगवटा अधिक वाढेल, शिवाय पाणी वाहून नेण्याची क्षमता घटण्याचा धोका आहे. त्याची किंमत काठावरील रहिवाशांना मोजावी लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गोदावरीच्या महापुरात बाजारपेठा, निवासी भागात मोठे नुकसान झाले. २००८ मधील पहिल्या महापुराच्या चौकशीत सुचविलेल्या उपायांची आजतागायत अंमलबजावणी झाली नसताना गोदावरी पात्राचा संकोच करण्याची प्रक्रिया मात्र अव्याहतपणे सुरू आहे.
सर्वसाधारण सभेत गोदावरीवर नव्याने दोन पूल बांधण्याचे मंजूर झालेले विषय हे त्याचे उदाहरण असून जादा विषयात सत्ताधाऱ्यांनी घाईघाईत अनेक विषय विनाचर्चा मंजूर केले. यामध्ये सुमारे ३६ कोटी खर्चाचे पंपिंग स्टेशनलगत आणि जेहान सर्कलपासून गोदावरीकडे जाणाऱ्या मार्गावर गोदावरीवरील दोन पुलांचा समावेश आहे. पुलासाठी निवडलेली जागा साशंकतेला बळ देत आहे. ज्या भागात आधीच पूल अस्तित्वात आहे, तिथेच नव्या पुलांची बांधणी करून नेमके कोणाचे हित जपले जाणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
या मुद्दय़ावरून सत्ताधारी भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. नव्या पूलबांधणीस आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध दर्शवत जनजागृती मोहीम सुरू केली. नव्या पुलांच्या बांधकामामुळे गोदा काठावरील परिसरास पुराचा तडाखा बसेल. विकासाच्या नावाखाली शहरास पुरात लोटण्याचा हा डाव अनेक कुटुंबांना नुकसानकारक ठरणार असल्याकडे फरांदे यांनी लक्ष वेधले. दुसरीकडे पालिकेतील कारभाऱ्यांनी हे काम पुढे रेटण्याची धडपड सुरू केली आहे.
गोदावरी पात्राची अवस्था
गोदावरी पात्राचा शहर परिसरात सर्वाधिक संकोच झाला असून शहरीकरणात लुप्त झालेले नैसर्गिक नाले आणि पात्रातील अतिक्रमणांमुळे गोदावरीची पाणी वाहून नेण्याची क्षमता घटली आहे. गंगापूर धरणातून एकाच वेळी ८१ हजार क्युसेकचा विसर्ग होऊ शकतो. कधीकाळी ६४ हजार क्युसेक पाणी वाहून नेणारे गोदावरीचे पात्र आता २० ते २५ हजार क्युसेकमध्ये पूरस्थिती निर्माण करते. नदीपात्रासह काठावरील अतिक्रमणे, कमी उंचीचे पूल, पुराची तीव्रता वाढविण्यास कारणीभूत ठरतात, यावर चौकशी समितीने पूर्वीच बोट ठेवले आहे. रामकुंड ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंत महापालिकेने पात्रात १७ घाट सिमेंट-काँक्रीटमध्ये बांधले आहेत. यामुळे नैसर्गिक प्रवाहास अडथळे येतात. अहिल्यादेवी होळकर पुलाखालील जुन्या बंधाऱ्याने मागील भागात फुगवटा निर्माण होतो. कमी उंचीचे पूल, गोदापार्क, गोदावरी सौंदर्यीकरणासाठी निळ्या रेषेत पालिकेने राबविलेल्या अनेक प्रकल्पांनी नैसर्गिक प्रवाहात अवरोध आणले. रामवाडी ते आनंदवल्ली या साडेचार किलोमीटरच्या अंतरात गोदावरीवर रामवाडी, चोपडा लॉन्स, वन विभाग रोपवाटिकालगत, आश्रमालगत आणि आनंदवलीत असे एकूण पाच पूल आहेत. आनंदवलीच्या नव्या पुलाखाली पात्रास समतल जुना पूल अस्तित्वात आहे. पंपिंग स्टेशन आणि आश्रमालगतच्या शहीद चित्ते पुलाशेजारी नव्याने दोन पूल बांधून पात्रातील अडथळ्यात आणखी भर पडणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राने आधीच गोदावरी, नासर्डी नदीपात्राचा अभ्यास केलेला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्यान्वये महापालिकेवर काही बंधने आहेत. संबंधितांचा पुलांबाबतचा प्रस्ताव अजून प्राप्त झालेला नाही. तसा प्रस्ताव आल्यानंतर सर्व बाबी तपासल्या जातील.
– राजेश मोरे
(अधीक्षक अभियंता आणि प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण)