नाशिक : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा एप्रिलमध्ये सलग वेगाने वाढलेला प्रादुर्भाव आठवडाभरात अर्थात मेच्या प्रारंभी काहिसा कमी झाला असून सक्रिय रुग्णांच्या संख्येत १० हजारहून अधिकने घट झाली आहे. मागील आठवडय़ात ९३ हजार ७३५ वर असणारी सक्रिय रुग्णांची संख्या आता ८३ हजार ३६२ वर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे तेव्हां दररोज १२ हजारच्या आसपास नवीन रुग्ण आढळत होते. ही संख्याही आता नऊ हजारावर आली आहे. नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्य सेवा नाशिक मंडळाच्या अहवालानुसार २४ तासात विभागात १२ हजार ५४३ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले. तर नऊ हजार १३१ नवीन रुग्ण आढळले. दिवसभरात ११८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.८३ टक्के असून मृत्यूदर १.२७ टक्के इतका आहे. विभागात आतापर्यंत सात लाख चार हजार ४३५ रुग्ण आढळले. त्यातील सहा लाख  ११ हजार ७२२ रुग्ण बरे झाले. एकूण आठ हजार ९५७ रुग्णांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात करोनाचा आलेख झपाटय़ाने उंचावला होता. अखेरीस तो काहिसा कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ३७३ ने कमी झाली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ३८ हजार ८६, जळगाव १० हजार ५२०, नंदुरबार सात हजार ५५३, धुळे ३५३३ आणि नगर जिल्ह्यात २३ हजार ६७० रुग्णांचा समावेश आहे. यातील ३१ हजार ९९० रुग्ण संस्थात्मक तर ३४ हजार २७८ रुग्णांचे निवासस्थानी अलगीकरण करण्यात आले आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या दोन लाख ३६ हजार ४६९ व्यक्ती गृहविलगीकरणात तर १८९७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. मागील २४ तासात विभागात ३६ हजार ६७४ चाचण्या करण्यात आल्या. त्यात नऊ हजार ९३१ अहवाल सकारात्मक आले. ८९५२ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

साडेनऊ हजार रुग्णांना प्राणवायूचा आधार

सक्रिय रुग्णांपैकी दोन टक्के अर्थात १२२४ जणांना व्हेंटिलेटर तर २१९६ म्हणजे ४.२ टक्के रुग्ण प्राणवायू व्यवस्थेवर अतिदक्षता विभागात आहेत. अतिदक्षता विभागात नसणाऱ्या तब्बल सात हजार २०८ रुग्णांना प्राणवायूचा आधार द्यावा लागत आहे. एकूण रुग्णांपैकी ५१ हजार ४६१ रुग्ण लक्षणविरहित, सौम्य लक्षणे असणारे आहेत. रुग्णालयात दाखल १७ हजार १८३ रुग्णांना प्राणवायूचा आधार देण्याची गरज पडलेली नाही.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona active patients in the decreased by 10000 within a week zws
First published on: 03-05-2021 at 03:05 IST