हॉटेल व्यावसायिक चिंतेत

नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी नव्या विषाणूचा संसर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याने प्रशासनासह साऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. जगभरात दहशतीचे वातावरण असून भारतातही केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. अवघ्या दोन दिवसांवर सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांचे स्वागत करण्याची वेळ आली असताना आयोजित कार्यक्रमांवर करोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंता आहे. सरत्या वर्षांला निरोप आणि नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी आता हॉटेल व्यावसायिक, कंपन्या, भांडवली क्षेत्रासह सर्वसामान्यांच्या कुटुंबांमध्येही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. हा दिवस अविस्मरणीय करण्याकडे अनेकांचा कल असतो. मागील वर्षी करोनाच्या संकटामुळे नववर्षांचे स्वागत करणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने घरीच थांबावे लागले होते. यंदा करोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने नववर्षांचे स्वागत जल्लोषात होईल, अशी सर्वाना अपेक्षा होती.

प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिकांकडून नववर्षांच्या स्वागतासाठी जल्लोषात तयारी केली जात आहे. त्यातच करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून रात्रीची संचारबंदी लागू केल्याने नव्या वर्षांचे स्वागत आणि तयारी यावर पाणी फेरते की काय असे चित्र आहे. यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. असे असले तरी २०२२ च्या स्वागताला घराघरांमध्ये आतापासूनच नियोजन सुरू झाले आहे. शहरातील विविध हॉटेल, सामाजिक, सांस्कृतिक संघटनांसह तरुणांचे वेगवेगळे गट नववर्ष स्वागताची जय्यत तयारी करीत आहेत. नववर्षांच्या स्वागताचे वेध तरुणाईला लागले आहेत. ३१ डिसेंबर आठवडय़ाच्या शेवटी येत असल्याने नव्या वर्षांचे स्वागत पर्यटनाने करण्यासाठी अनेक जण सज्ज झाले आहेत.

एक ते दोन दिवसांच्या सहलीचे सहकुटुंब नियोजन सुरू आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सापुतारासह अन्य भागांत शेतघर, रिसोर्ट यांच्यात नोंदणी झाली आहे. नव्या वर्षांच्या स्वागताची जय्यत तयारी असताना ऐनवेळी पोलीस तसेच प्रशासनाकडून जाहीर होणाऱ्या नियमावलीकडे हॉटेलचालकांसह अन्य व्यावसायिक, पर्यटक यांचे लक्ष लागले आहे.