नागरिकांसह व्यापारी वर्गाला दिलासा

नाशिक : करोनाच्या संकटामुळे अनेक महिन्यांपासून शहर व ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये असणारे निर्बंध शिथील झाल्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे. निर्बंध शिथील झाल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत बाजारपेठ चांगलीच गजबजली. ग्राहकांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद लुटला. खाद्य पदार्थ, हॉटेलमध्ये गर्दी होती. अनेक महिन्यात रखडलेली खरेदी करण्याकडे अनेकांचा कल होता. निर्बंधामुळे व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला होता. दुकानांची वेळ वाढविल्याने व्यवसायाची गाडी रुळावर येण्यास हातभार लागणार असल्याची भावना उमटत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीची मंगळवारपासून स्थानिक पातळीवर अमलबजावणी सुरू झाली. मागील काही महिन्यांपासून शहर, जिल्ह्याातील  दुकानांसाठी सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दुपारी चार वाजेपर्यंत मुभा होती. तसेच शनिवार व रविवार हे दोन्ही दिवस बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवल्या जात होत्या. निर्बंधामुळे व्यवसायाची घडी विस्कटली. त्यामुळे हे निर्बंध शिथील करण्याची मागणी व्यापारी, व्यावसायिक संघटनांकडून केली जात होती. नव्या नियमावलीमुळे सोमवार ते शुक्रवार या काळात सर्व दुकाने आणि बाजारपेठ रात्री आठ वाजेपर्यंत खुली राहील. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. तर रविवारी फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील.

दुकानांची वेळ वाढविल्यामुळे सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत बाजारपेठांमध्ये होणारी गर्दीवर काहिसा परिणाम झाला आहे. आधी त्या वेळेतच खरेदी करणे क्रमप्राप्त होते. दुकाने आठ वाजेपर्यंत खुली राहिल्याने ग्राहक त्यांच्या सवडीनुसार बाजारात खरेदी करू शकतात. उलट हा निर्णय गर्दी कमी करण्यास हातभार लावू शकतो, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. रविवार कारंजा, मेनरोड या मध्यवर्ती बाजारपेठांसह सर्व भागातील दुकानांमध्ये ग्राहक खरेदीचा आनंद घेताना पहायला मिळाले. ग्रामीण भागात वेगळे चित्र नव्हते. मंगळवारी पहिल्याच दिवशी सायंकाळनंतर एरवी शांत असणाऱ्या बाजारपेठा गजबजल्या. बाजारपेठ रात्री आठ पर्यंत खुली राहणार असल्याने नागरिकांनीही सायंकाळनंतर सहकुटुंब विविध वस्तूंच्या खरेदीसाठी हजेरी लावली. खाद्य पदार्थांची दुकाने, फरसाण, हॉटेल, रेस्टॉरंट या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

सर्व प्रकारची बाजारपेठ, दुकाने, शेतीविषयक कामे, बांधकाम वस्तू आणि विविध वस्तू, वाहतूक उद्योग व्यवसाय हे पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र प्रार्थना स्थळे बंद राहतील. शाळा, महाविद्यालयांबाबत अजून निर्णय झालेला नाही. दरम्यान निर्बंधातून सुटका झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. निर्बंध शिथील झाले असले तरी करोना प्रतिबंधक नियमावलीचे, सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्याचे कळकळीचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infected corn restriction open market akp
First published on: 04-08-2021 at 00:06 IST