मालेगावात खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
मालेगाव : शहरात करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी अजून धोका टळलेला नाही. त्यासाठी सर्वानी नियमांचे पालन करुन योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. करोना विषाणूशी यशस्वीरीत्या लढण्याचे एक आगळेवेगळे उदाहरण मालेगाव शहराने सर्वासमोर ठेवले आहे. त्यामुळे येणारा बकरी ईद आणि अन्य सण, उत्सव संयमाने साजरे करुन मालेगावकरांनी लौकिक आणखी वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे यांनी मार्गदर्शन केले. करोनावर मात करणाऱ्या मालेगाव प्रारूपाबाबत विचारणा होते. त्या वेळी येथील लोकांच्या मनातून करोनाची दूर झालेली भीती हेच खरे प्रारूप असल्याचे आपण आवर्जून सांगतो. करोनासारख्या महामारीवर मालेगाव प्रारूपने जो नावलौकिक मिळविला आहे, तो वाढविण्यासाठी सर्वाचे सहकार्य आवश्यक असल्याचे मांढरे यांनी सांगितले. शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आणि चार महिन्यांत ज्या पद्धतीने सर्व धर्मीयांचे सण मर्यादित स्वरूपात साजरे झाले. त्याचप्रमाणे येणारा बकरी ईददेखील साधेपणाने साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन संपूर्ण सहकार्य देईल आणि त्यासाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत असल्याची माहिती दिली. करोना संकटाच्या सध्याच्या काळात निरोगी जीवन जगणे हे महत्त्वाचे असल्याने सण, उत्सव साजरे करताना गर्दी होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी करोना संकटामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून नागरिकांवर रोजीरोटीसाठी झगडण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत सण, उत्सव साजरे करताना शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन आमदारांनी केले. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मालेगावातील सामाजिक सलोख्याचे कौतुक केले.
महानगरपालिकेच्या वतीने बकरी ईदच्या अनुषंगाने संपूर्ण शहरात आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही पालिका उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. शांतता समितीचे सदस्य युसूफ इलियास, जमील अन्सारी, शफीक राणा, हिदायत उल्ला, रियाज अन्सारी, बशीर शाह, इम्तियाज इक्बाल, इस्माईल जमाली, केवळ हिरे, हरिप्रसाद गुप्ता, सुनील चांगरे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. या वेळी उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले आदी उपस्थित होते.