अंत्यसंस्कारातील सहभागाने करोनाच्या रुग्ण संख्येत वाढ
नाशिक : शहरात २४ तासांत करोनाचे आतापर्यंत सर्वाधिक ६१ रुग्ण आढळून आल्यामुळे रुग्णसंख्या साडेचारशेच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. दाट लोकवस्तीच्या भागात अनेक रुग्ण सापडल्याने करोनाचा सामाजिक पातळीवर प्रसार सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे. एक-दीड महिन्यात काही संशयितांचा अहवाल येण्याआधीच मृत्यू झाला. त्यातील साधारणत: १० रुग्णांच्या अंत्यसंस्काराला नातेवाईक, परिसरातील रहिवाशांनी गर्दी केली होती. संबंधित रुग्णांचे अहवाल नंतर सकारात्मक आले. यामुळे अंत्यसंस्कारात सहभागी झालेले कुटुंबिय, नातेवाईक आणि आसपासची मंडळी करोनाबाधित झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे.
सोमवारी सकाळी ४१ अहवाल प्राप्त झाले. ३७ जणांचे अहवाल नकारात्मक, तर चार नवीन रुग्ण आढळले. यामध्ये देवळाली कॅम्प एक, माडसांगवी येथील दोन महिला तर पिंपळगाव येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्य़ात मालेगाव शहरात प्रारंभी मोठय़ा प्रमाणात करोनाचा फैलाव झाला. आता तेथील स्थिती काहीशी नियंत्रणात येत असतांना दुसरीकडे नाशिक शहरात उंचावणारा आलेख चिंतेत भर टाकत आहे. रविवारी एकाच दिवसात शहरात मोठय़ा संख्येने रुग्ण सापडले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची शोध मोहीम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत शहरात करोनाचे ४२७ रुग्ण आढळले असून त्यातील २० जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर १४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या २५९ रुग्ण उपचार घेत आहेत. वडाळा, पेठ रस्त्यावरील काही दाट लोकवस्तीचे भाग तसेच जुने नाशिक भागात रुग्ण वाढत आहेत. जुन्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने नाईकवाडीपुरा येथील सहा जण बाधित झाले. नंतर पुन्हा याच भागातील दोन लहान मुलींसह ११ जणांचे अहवाल सकारात्मक आले. भराडवाडी येथील युवती आणि सहा महिन्याच्या बालिकेचा अहवाल सकारात्मक आला. वाढत्या रुग्णांमुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ८९ वर पोहचली आहे.
अनेक रुग्ण घनदाट वस्ती किंवा झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास आहेत. यामुळे करोनाचा सामाजिक पातळीवर संक्रमण होण्याची भीती आहे. त्यास करोना नियंत्रण कक्षाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. टाळेबंदीत अंत्यविधीसाठी केवळ २० नातेवाईकांनी उपस्थित रहावे हा निकष आहे. आतापर्यंत १० ते १२ मयत रुग्णांचे अहवाल त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आले. त्यातील काही जणांच्या अंत्यविधीला नातेवाईक, आसपासच्या नागरिकांनी गर्दी केली होती. करोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे त्या कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकही बाधित झाल्याचे डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले. संजीवनगर येथील मयताच्या अंत्यसंस्कारावेळी घराबाहेर मांडव टाकण्यात आला होता. तिथे मोठी गर्दी जमली. अशी गर्दी १० ते १२ मयतांच्या अंत्यसंस्कारावेळी झाल्याचे पलोड यांनी सांगितले.
सीसी टीव्ही लावून नजर ठेवली जाते. पण अनेकदा सूचना देऊनही लोक ऐकत नाही. बाधितांमध्ये अशा अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्याकडे पलोड यांनी लक्ष वेधले.
जिल्हा १६०० च्या उंबरठय़ावर
सोमवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे नाशिक जिल्ह्य़ात करोनाबाधित रुग्णांची संख्या १५९२ वर पोहचली आहे. शहरालगतच्या भागातील तीन तर पिंपळगाव येथील एका व्यक्तीचा नव्या रुग्णात समावेश आहे. एकूण रुग्णांपैकी १०४६ जण करोनामुक्त होऊन घरी परतले. ९७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ४४५ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात मालेगाव महापालिका क्षेत्रात ८३, नाशिक ग्रामीणमधील ९३, जिल्ह्य़ाबाहेरील १४ रुग्णांचा समावेश आहे.