नवरात्रोत्सवात भाविकांकडून फुलांची विक्री होण्याची विक्रेत्यांची अपेक्षा

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक  : नवरात्रोत्सव अवघ्या काही तासांवर आला असताना अद्याप बाजारपेठेत शुकशुकाट आहे. करोना महामारीमुळे सर्वच प्रार्थनास्थळे बंद असल्याने धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलही बंद आहे. याचा सर्वाधिक परिणाम शहरात कायम टवटवीत राहणाऱ्या फुलांच्या बाजारावर झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात फुलांचा बाजार निस्तेज झाला असून विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे. नवरात्रोत्सवास सुरुवात झाल्यावर काही प्रमाणात तरी फु लांना मागणी वाढेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहेत. मंदिरांसह अन्य प्रार्थनास्थळे बंद झाल्याने करोना संसर्गाचा धोका काही प्रमाणात रोखण्यात यश आले असले तरी प्रार्थनास्थळ आणि त्या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना मात्र आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यात सर्वाधिक फटका फूल विक्रेत्यांना बसला आहे. पूर्वी फु लांमुळे  गुलशनाबाद अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात सध्या ग्राहकांअभावी फू ल विक्र ेते हताश झाले आहेत.

मंदिराबाहेर, धार्मिक विधी तसेच मंदिर सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांची मागणी मंदिरे बंद असल्याने एकदमच कमी झाली आहे. के वळ नित्यनेमाने होणारी पूजा मंदिरांमध्ये के ली जात असल्याने त्यासाठी अत्यंत कमी प्रमाणात फु लांचा वापर के ला जात आहे. खर्चही निघत नसल्याने फूल विक्रेत्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

देवीसाठी हार, मंदिर सजावट किंवा घरातील काही सजावट यासाठी होणारी आगाऊ मागणी ग्राहकांकडून अद्याप नोंदविण्यात आलेली नाही. परंतु, नवरात्रोत्सवास सुरुवात झाल्यावर घरगुती घटस्थापनेसाठी फुलांची मागणी वाढू शकेल, अशी आशा विक्रेत्यांना आहे.

पंचवटी येथील फूल विक्रेते भूषण गायकवाड यांनी त्यांचा अनुभव मांडला आहे. सहा महिन्यांपासून मंदिर बंद असले तरी सध्या नवरात्र जवळ आल्यामुळे झेंडू, शेवंती आणि मखमलच्या फुलाला मागणी आहे. परंतु, चित्र फारसे आशादायी नाही. पंचवटीतून सप्तशृंग गडावर किंवा अन्य भागात फुलांची विक्री होत होती. शहर परिसरातील गोदाकाठची सांडव्याची देवी, घनकर लेनमधील तुळजा भवानी मंदिर यासह अन्य मंदिरांत सजावटीसाठी फुलांची मागणी असायची.

याशिवाय गडावर जाणारे भाविक पंचवटीमधून मोठय़ा प्रमाणावर फुले किंवा हार आदी साहित्य घेऊन जात असत. यंदा मंदिरे बंद असल्याने कोणाकडूनही फुलांची मागणी नाही. सार्वजनिक मंडळांचा नवरात्र उत्सवही बंद आहे.

घरगुती स्वरूपात साजऱ्या के ल्या जाणाऱ्या उत्सवावर सर्व भिस्त असून सध्या अल्प मागणी असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. फूल विक्रेते विक्रम मंडलिक यांनी लोकांकडे पैसे नसल्याने सर्वच कार्यक्रम साध्या पद्धतीने कमी खर्चात होत असल्याकडे लक्ष वेधले. हार-तुरे किंवा अन्य सजावटीसाठी मोठय़ा प्रमाणावर उत्पादकांकडून खरेदी के लेल्या फुलांचा खर्चही निघत नाही. परंतु, नवरात्रीमुळे मागणी वाढून फुलांचे दर काही अंशी वाढतील, असे त्यांनी सांगितले.

फुलांचे सध्याचे दर

शेवंती (कॅ रेटचे भाव) १८० ते २०० रुपये किलो, पिवळा झेंडु २५० रुपये, नारंगी झेंडु २०० रुपये, मखमल २०० रुपये, अष्टर २०० ते  २५० रुपये, निशिगंधा २५० रुपये असे आहेत. याशिवाय लिली १० ते १५ रुपये जुडी, जलबेरा ४० रुपये जुडी, लाल (डच रोझ) २० रुपये नग, टाटा गुलाब १२ रुपये नग, वेणी २० रुपये नग, गजरा १५ रुपये नग याप्रमाणे भाव आहेत.