नाशिक : पेटीएम कंपनीचा अधिकारी असल्याची बतावणी करीत संशयितांनी केवायसी सुधारित करण्याच्या नावाखाली वृद्धाच्या पेटीएमशी संलग्न असलेल्या आरबीएल बँकेच्या खात्यातून परस्पर ४८ हजार ८६९ रुपये काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत विजय मिरजकर (७६, गणेश सोसायटी, शिखरेवाडी) यांनी तक्रार दिली. मिरजकर यांच्याशी संशयितांनी संपर्क साधला. पेटीएम कंॉपनीचा अधिकारी असल्याची बतावणी केली. केवायसी अद्ययावत करण्याचा बहाणा करून त्यांच्या पत्नीच्या भ्रमणध्वनीवर एक लिंक पाठवली. ती लिंक वृद्ध दाम्पत्याने अद्ययावत करताच वृद्धाच्या पेटीएमला संलग्न आरबीएल बँक खात्यातून चार व्यवहार होऊन ४८ हजार ८६९ रुपयांची रोकड परस्पर काढली गेली. या प्रकरणी वृद्ध दाम्पत्याने दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडीत वस्तू, साडय़ा लंपास

सिडकोतील शिवाजी चौकात झालेल्या घरफोडीत चोरटय़ांनी दागिन्यांसोबत संसारोपयोगी वस्तू आणि साडय़ा चोरल्या. याबाबत सतीश मोहिते (रा. शिवाजी चौक) यांनी तक्रार दिली. मोहिते कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली. चोरटय़ांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याची अंगठी, आठ साडय़ा आणि संसारोपयोगी वस्तू असा ४२ हजारांचा ऐवज चोरला. यामध्ये दोन सिलिंडर, पाण्याचे हांडे, मिक्सर, कुकर आदींचा समावेश आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंग प्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा

रुग्णालय इमारतीत भाडेतत्त्वावर असलेल्या एका संस्थेच्या कार्यालयात शिरून डॉक्टरने महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली.  काठेगल्लीत रुग्णालयाच्या इमारतीत वृद्धाश्रमाचे कार्यालय आहे. या ठिकाणी महिला सेवा बजावत असताना किरण शिंदे या संशयिताने विनयभंग केला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.