नाशिक : मद्य सेवनासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी कोयत्याचा धाक दाखवित मारहाण करून रिक्षाचालकास लुटल्याची घटना अमरधाम रस्त्यावरील पुलावर घडली. याबाबत बंटी तिडके या रिक्षाचालकाने तक्रार दिली. तिडके हे पंचवटी भागात प्रवासी सोडण्यासाठी गेले होते. दुपारी अमरधाम रस्त्याने जात असतांना दोघांनी रिक्षा अडवली. संशयितांनी मद्यपान करण्यासाठी पैश्यांची मागणी केली. चालक तिडके यांनी नकार देताच संशयितांनी कोयता काढून पोटाला लावला. मारझोड करीत तिडके यांच्या खिशातील ६०० रूपये बळजबरीने काढून पलायन केले. या प्रकरणी विकी उर्फ कोयत्या काळ्य़ा आणि बॉबी या संशयितांविरुध्द पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवकाचा भ्रमणध्वनी खेचून पलायन गंगापूर रस्त्यावरील वाघ
गुरूजी शाळेसमोरील रस्त्याने भ्रमणध्वनीवर बोलत पायी जाणाऱ्या युवकाचा भ्रमणध्वनी दुचाकीने आलेल्या चोरटय़ांनी खेचून नेला. याबाबत प्रतिक खैरनार (२१, पूर्णवादनगर, आकाशवाणीजवळ) या युवकाने तक्रार दिली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
पायी घराकडे जाणाऱ्या महिलेच्या गळ्य़ातील मंगळसूत्र दुचाकीने आलेल्या चोरटय़ांनी हिसकावून नेले. दीपालीनगर भागात ही घटना घडली. याबाबत मनिषा गाडेकर (गिरीश सोसायटी, दीपालीनगर) यांनी तक्रार दिली. गाडेकर या महामार्गावरील दीपालीनगर बस थांब्याकडून आपल्या घराकडे पायी जात असतांना शर्मा मंगल कार्यालय परिसरात दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्य़ातील ४० हजार रूपयांचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदनाचे झाड लंपास
सोसायटी आवारातील चंदनाचे झाड चोरटय़ांनी कटरने कापून नेल्याची घटना वडाळा-पाथर्डी रस्त्यावर घडली. याबाबत महेंद्रसिग राजपूत (विराज सोसायटी, वडाळा-पाथर्डी रस्ता) यांनी तक्रार दिली. विराज सोसायटीच्या आवारातील १० फूट उंचीचे चंदनाचे झाड चोरटय़ांनी कटरच्या सहाय्याने कापून चोरून नेले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.