नारायण राणे यांच्या विरोधात गुन्ह्यांचे सत्र
मालेगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल ग्रामीण भागात शिवसैनिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. मालेगाव येथे संतप्त शिवसैनिकांनी राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला आहे. मनमाड, मालेगाव येथे राणे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शिवसेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कडक कारवाईची मागणी केली. ठाकरे यांच्या कार्यकुशलतेमुळे देशात प्रथम क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची गणना होत असतांना राणे हे त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असून राज्यातील जनता हे मुळीच खपवून घेणार नसल्याचे शिवसैनिकांनी म्हटले आहे. यावेळी शिवसेनेतर्फे
अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सेनेचे तालुकाप्रमुख अॅड. संजय दुसाने, प्रमोद शुक्ला, महानगरप्रमुख रामा मिस्तरी, विनोद वाघ आदी उपस्थित होते. दरम्यान बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे यांनी राणेंविरोधात तालुका पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
मनमाडमध्येही आंदोलन
शिवसैनिकांनी मंगळवारी मनमाड येथील एकात्मता चौकात घोषणाबाजी व निदर्शने के ली. मोर्चा काढत शहर पोलिस स्थानकांत राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी लेखी मागणी केली. त्यावरून शहर पोलिसांनी राणेंविरोधात गुन्हा दाखल केला. दुपारी एकात्मता चौकात सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते एकत्र झाले. त्यांनी राणे यांच्या निषेधार्ह घोषणा देत निदर्शने केली. त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी काही कोंबड्याही धरून आणल्या होत्या. शहरप्रमुख मयुर बोरसे, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड आदींनी नारायण राणे यांच्याविरुध्द तक्रार दिली. त्यावरून मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सटाण्यात रास्तारोको
सटाणा येथील शिर्डी-साक्री महामार्गावरील बस स्थानकासमोर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत राणे यांच्या वक्तव्याचा शिवसैनिकांनी निषेध केला. राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करत सटाणा शहर शिवसेना व युवा सेनेने तासभर रास्ता रोको आंदोलन केले. उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे व शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.