शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी वाहन तपासणी, नाकेबंदी यांसारखे उपाय सुरू केल्याने गुन्हेगारीचा स्तर काही प्रमाणात निश्चितच कमी झाला आहे. त्यातच कोणत्याही राजकीय व्यक्तीचा मुलाहिजा न बाळगता अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडून पोलीस आक्रमक झाल्यावर काय करू शकतात याचे दर्शन नाशिककरांना होऊ लागले. असे असले तरी गुंडगिरीला प्रोत्साहन मिळणाऱ्या ठिकठिकाणच्या चौकांमधील खाद्यपदार्थाच्या टपऱ्या, हातगाडय़ांभोवती रात्रीच्या वेळी पडणारा नको त्या मंडळींचा गराडा पोलिसांनी हटविण्याची गरज निर्माण झाली आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता चौकाचौकांमध्ये अनेक हातगाडय़ा सायंकाळनंतर अचानक उभ्या राहण्यास सुरुवात होते. यापैकी काही गाडय़ांभोवती मद्यपींचा गराडा पडलेला दिसून येत असून उघडय़ावर सुरू असलेले मद्यपान रोखणे हे पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे.

पोलिसांवर होत असलेले कमकुवतपणाचे आणि गुंडांपुढे शरणागती पत्करत असल्याचे आरोप खोटे ठरविण्यासाठी नाशिक पोलिसांनी कंबर कसली आहे. नियोजनबद्ध पद्धतीने गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू करण्यात आले असून केवळ वरवरचा देखावा या कारवाईत राहणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे सध्या तरी दिसून येते. ज्या भाई, दादा, अण्णा यांच्या नावाने चौक, गल्ली, बोळ थरथरत होते, त्यांना त्यांच्याच भागात फरफटत नेऊन त्यांची खरी लायकी दाखविण्याचे काम पोलिसांकडून होत असल्याने गुंड चांगलेच हादरले आहेत.

मागील दीड-दोन महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये गुंडगिरीचे असलेले चित्र आता पूर्णपणे पालटले आहे. दोन महिन्यांपूर्वी नाशिकच्या पोलिसांवर गुंड वरचढ ठरले होते. पोलिसांची कोणतीही भीड न बाळगता बिनदिक्कतपणे रविवार पेठेसारख्या भागात युवकाची दगड, विटांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी जणू काही गुंडांपुढे सपशेल लोटांगण घातल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांच्या थंडपणाविषयी नाशिककरांमध्ये असंतोष निर्माण झाल्यावर मात्र पोलिसांनी ‘नवा जोम नवा जोश’ आल्याप्रमाणे कारवाईस सुरुवात केली. पोलिसांच्या आक्रमकपणामुळे खुद्द गुंडांनाही आश्चर्य वाटले असेल. कालपर्यंत शेळपटपणा दाखविणाऱ्या पोलिसांमध्ये अचानक झालेला बदल नाशिककरांनाही चकित करणारा ठरला.

राजकीय पाठबळ असलेल्या बडय़ा धेंडांना थेट त्यांच्या घरी जाऊन सर्वासमक्ष पाणउतारा करण्यात येऊ लागला. तडीपारीच्या कायद्याचा कोणताही परिणाम होत नसल्याने गुंडांवर वचक बसविण्यासाठी इतर कायद्यांचा आधार घेण्यात येऊ लागला. अवैध धंद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत गुंडांना मिळणारी आर्थिक रसद तोडण्यात आली. त्यामुळे गुंड सैरभैर झाले असून पोलिसांच्या भयामुळे काही जणांनी नाशिक सोडल्याचे सांगण्यात येते.

असे असले तरी पोलिसांच्या कारवाईतून अद्यापही ठिकठिकाणच्या चौकांमध्ये हातगाडय़ांवर खाद्यपदार्थाचा व्यवसाय करणारे काही असामाजिक तत्त्व सुटले आहेत. जुन्या सीबीएसजवळील सटाणा, कळवणसाठी प्रवासी भरणाऱ्या टॅक्सी स्थानक परिसरात असलेल्या मद्याच्या दुकानातून दारू घेऊन उघडय़ावर रिचविण्याचे प्रयोग सुरू असतात. याशिवाय सिडकोतील स्टेट बँक चौक असो, नवीन आडगाव नाका परिसरातील चौफुली असो, या सर्वच ठिकाणी पोलिसांकडून नियमित तपासणी होण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी काही जणांकडून खाद्यपदार्थावर ताव मारत मद्यपानही केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. नवीन आडगाव नाका परिसरातील काही रहिवाशांनी या संदर्भात याआधीही तक्रारी केलेल्या आहेत; परंतु तक्रारींची दखल घेण्यात येत नसल्याने या भागात रोज एकेक नवीन हातगाडी, टपरीची भर पडत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पोलिसांनी अशा ठिकाणी अवैध प्रकार रोखण्याची गरज व्यक्त होत आहे.