मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यान्वित करण्यात आलेल्या यंत्रमानव व कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘रोबोटिक्स ॲन्ड एआय’ प्रयोगशाळेचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे हस्ते करण्यात आले. अशा प्रकारची ही नाशिक जिल्ह्यातील पहिली प्रयोगशाळा आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने तालुकास्तरावर एक याप्रमाणे आणखी १२ प्रयोगशाळा जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहेत. यात शिक्षणमंत्री भुसे यांच्या मतदारसंघाला प्राधान्य मिळाले.

या प्रयोगशाळांमुळे शालेय विद्यार्थ्यांचे ज्ञान व सर्जनशीलता वाढीला चालना मिळेल, असा विश्वास शिक्षणमंत्री भुसे यांनी व्यक्त केला. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जिज्ञासा असते. त्या अनुषंगाने अशा प्रयोगशाळांमुळे विद्यार्थी संशोधनाकडे वळू शकतील. त्यांच्या विचारशक्तीला कृतिशीलतेची जोड मिळू शकेल, असे भुसे यांनी नमूद केले. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी सोय उपलब्ध करून देणारा नाशिक जिल्हा परिषदेने सुरू केलेला ‘सुपर ५०’ हा उपक्रम राज्यात राबविण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. ही प्रयोगशाळा बघण्यासाठी अन्य शाळांचे विद्यार्थी भेट देतील. त्यांना योग्य माहिती मिळेल व त्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने दाभाडी ग्रामपंचायतीने काळजी घ्यावी, अशी सूचना देखील त्यांनी केली.

याप्रसंगी सरपंच प्रमोद निकम,माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर कनोज,गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे,गट शिक्षणाधिकारी नीलेश पाटील आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रयोगशाळेत नऊ दालने

राज्य शासनाने २०४७ मध्ये विकसित महाराष्ट्राचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी व्यक्त केला. या प्रयोगशाळेत नऊ प्रकारची दालने आहेत. भविष्याचे नियोजन व गरज लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलची माहिती त्यात अंतर्भूत असणार आहे. ग्रामीण भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी या प्रयोगशाळा उपयुक्त ठरतील, असेही मित्तल म्हणाल्या.