जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत एक लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे.

सौर कृषिपंप योजनेमुळे गती

नाशिक : शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत नाशिक परिमंडलात तीन, पाच आणि साडेसात अश्वशक्तीचे सहा हजार ५५७ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात तीन हजार ९९८ तर, अहमदनगर जिल्ह्याातील दोन हजार ५६९ सौर कृषिपंपाचा समावेश आहे.

या सर्व शेतकऱ्यांना दिवसा विनाव्यत्यय वीजपुरवठा उपलब्ध झाला असून देयकांतून मुक्तता झाली आहे. नवीन जोडण्यांसाठी स्वतंत्र कृषिपंप वीज जोडणी धोरणाद्वारे वेग देण्यात आला आहे. यात मुख्यत्वे कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सौर कृषिपंप योजनेचा समावेश आहे. पारंपरिक पद्धतीने कृषिपंपाची वीजजोडणी न झालेले व महावितरणकडे वीज जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना सौर ऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून पारेषणविरहित नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहे. अतीदुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यासाठी सौर कृषिपंपाच्या आधारभूत किंमतीपैकी सर्वसाधारण गटासाठी १० टक्के तर अनुसूचित जाती/जमाती गटातील शेतकऱ्यांसाठी पाच टक्के लाभार्थी हिस्सा आहे.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत एक लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातून आतापर्यंत दोन लाख ४० हजार ६१७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ९७ हजार ९ लाभार्थ्यांनी मागणी पत्राचा भरणा केला आहे. तर ९६ हजार १९१ लाभार्थ्यांनी स्वत: निवड सूचीतील संबंधीत पुरवठादारांची निवड केली आहे. त्यातील ८५ हजार ९६३ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत.

आवश्यक कागदपत्र जोडलेले नसणे, स्थळ तपासणीनंतर कृषिपंपाची वीज जोडणी आढळून येणे, जलस्त्रोत नसणे, विहीर किंवा कूपनलिका ६० मीटरपेक्षा खोल असणे तसेच मागणी पत्र दिल्यानंतरही लाभार्थी हिस्सा न भरणे आदी कारणांमुळे एक लाख २४ हजार ६९२ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत नाशिक परिमंडलात साडेसहा हजारहून अधिक सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत.

वीज यंत्रणेचे जाळे नसल्यामुळे आणि पारेषणविरहित असल्याने सौर कृषिपंपांद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. सोबतच शेतकऱ्यांची वीज देयकातून सुटका झाली आहे. आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषिपंपासाठी पाच वर्ष तसेच पॅनेलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखभालीचा खर्च देखील शून्य आहे. या योजनेची सर्व माहिती महावितरणच्या स्वतंत्र पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक टप्प्यावर त्याबाबत अर्जदारांना लघूसंदेशाद्वारे कळविले जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Daily power supply to four thousand farmers in the district akp

ताज्या बातम्या