जिल्ह्य़ात गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात कोसळलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांच्या जलसाठय़ातही कमालीची वाढ झाली आहे. साक्री तालुक्यातील चार धरणे तुडुंब भरली. जिल्ह्य़ात गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारीही कायम राहिला. सुमारे ३० तास जिल्ह्य़ात जोरदार पाऊस झाला. साक्री तालुक्यातील मालणगाव, काबऱ्याखडक, बुरुडखे, जामळेली ही चार धरणे तुडुंब भरली. तर लाटीपाडा ६३, शेलबारी व विरखेल ही धरणे ६० टक्के भरली. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावातील साठा आठ, तर नकाणे तलावातील साठा १० दशलक्ष घनफूटने वाढला. शिरपूर तालुक्यातील अनेर व करवंद ही धरणेही ओसंडून वाहू लागली आहेत. साक्री तालुक्यातील रोहिणी नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या सीताबाई भील (६६, जैताणे) यांचा मृतदेह शनिवारी हातेड गावाजवळ नदीपात्रात आढळून आला.