शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या तसेच विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींची आठवण जपण्यासाठी त्यांची नावे प्रमुख चौक वा रस्त्यांना देण्याचा आजवरचा प्रघात मोडण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. सिडकोतील संभाजी स्टेडियमलगतच्या चौफुलीचे ‘दै. सामनाचे संपादक लोकनेते खासदार संजय राऊत मार्ग’ असे नामकरण करावे, अशी मागणी सेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी केली आहे.

प्रभाग क्रमांक २७ च्या सेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी नामकरणाबाबत सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्याविषयी नगरसचिवांना पत्र दिले आहे. राजे संभाजी स्टेडियमलगतच्या नम्रता पेट्रोल पंपाच्या बाजूला अंबड-सिडको-पाथर्डी चौफुली या ठिकाणास कोणतेही नाव नाही. परिणामी, स्थानिक नागरिकांना पत्ता सांगण्यास त्रास होतो. स्थानिकांसह शिवसैनिकांच्या मागणीनुसार या मार्गाच्या नामकरणाची मागणी गामणे यांनी केली आहे.

शहरात रस्ते, मार्ग आणि चौकांचे नामकरण करताना संबंधित व्यक्तीच्या योगदानाचा विचार केला जातो. शहर, परिसराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या, कर्तृत्ववान व्यक्तींची नावे चौक किंवा रस्त्यांना देण्याची परंपरा आजवर सांभाळली गेली आहे. या माध्यमातून त्या व्यक्तींच्या स्मृती जतन करणे, त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा मानस असतो. सेनेच्या मागणीमुळे या परंपरेला छेद दिला जाणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

पक्ष कार्यामुळे राऊत यांचा नाशिकशी निश्चितपणे संबंध आहे. पूर्वी नाशिकचे संपर्कमंत्री आणि सध्या उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख म्हणून ते जबाबदारी सांभाळतात. सेनेच्या मुखपत्राचे संपादक असणाऱ्या राऊत यांनी खासदार निधीतून नाशिकमध्ये काही विकास कामांसाठी निधी दिल्याचे ऐकिवात नाही. शहराच्या जडणघडणीशी संबंध नाही. या स्थितीत थेट राऊत यांचे नाव रस्त्याला देण्याचा विषय पुढे आल्यामुळे अनेक नगरसेवक बुचकळ्यात पडले आहेत. तसे नामकरण झाल्यास चुकीचा पायंडा पडेल, याकडे काही जणांनी लक्ष वेधले आहे.