नाशिक – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली बी.डी. भालेकर शाळा पाडून त्या ठिकाणी विश्रामगृह होणार आहे. इमारत जुनी असल्याचे सांगत पाडकाम करण्यात येणार असून स्थानिकांच्या भावना लक्षात घेता आता लोकप्रतिनिधीही त्या जागेवर शाळा सुरू करावी, यासाठी आक्रमक होत आहेत. रविवारी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी शालेय इमारतीची पाहणी करुन या जागेवर शाळाच सुरू करावी, अशी मागणी केली.

बी .डी .भालेकर शाळा वाचवा समितीच्या वतीने शाळा वाचविण्यासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाचा रविवारी सहावा दिवस होता. शाळा पाडण्याचा अंतिम निर्णय महापालिकेने घेतला आहे. शाळा पाडली तरी त्या जागेवर नवीन अद्यावत शाळा सुरू करावी, अशी मागणी समितीकडून होत आहे. समितीमध्ये ज्येष्ठांसह युवावर्गही आहे. याशिवाय परिसरातील लहान मुलेही ही शाळा वाचविण्यासाठी आंदोलनात जमेल तसा सहभाग घेत आहेत. शाळेचे महत्व आणि लोकांच्या भावना लक्षात घेता लोकप्रतिनिधी आता या लढ्यात उतरत आवाज उठवित आहेत. मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी आंदोलकांची भेट घेत शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांची आंदोलकांनी भेट घेत या जागेवर शाळेची इमारत उभी रहावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.

रविवारी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी भालेकर शाळेला भेट दिली. मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्याशी दुरध्वनीवरून संवाद साधला. बी. डी. भालेकर शाळा सुरू करा, इमारत पाडण्याची आवश्यकता नाही. मजबूत आहे. आजूबाजूला गरीब वस्ती आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घ्या, नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची गरज पाहता शाळा बंद करू नका, शाळा सुरू करा, विश्रामगृह नको, अशी मागणी केली. नाशिककर मागणी करत आहेत. याचा विचार करा, असेही आंबेडकर यांनी सांगितले. मराठी शाळा वाचली पाहिजे. मराठी माणूस हद्दपार होत आहे. गरज पडल्यास रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. बी. डी. भालेकर शाळा वाचवा समितीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.