१०० नळ जोडण्या खंडित, मालमत्ताकर थकविणाऱ्यांनाही नोटीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : करोनामुळे आधीच घटलेले उत्पन्न, त्यात सातव्या वेतन आयोगाचा पडलेला भार आणि निवडणूक वर्ष असल्याने विकास कामांसाठी निधीची वाढती मागणी या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने धडक मोहिमेद्वारे थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या अंतर्गत बडय़ा थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला गेला असून मागील काही दिवसात सुमारे १०० जणांची नळ जोडणी खंडित केली गेली. तर जाणीवपूर्वक मालमत्ता कर थकविणाऱ्या मिळकतदारांना थेट सूचना देत संबंधितांच्या मालमत्तेच्या लिलावाची तयारी केली जात आहे.

करोनाच्या संकटात महापालिकेने जवळपास दीड वर्ष पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीसाठी कठोर पावले उचलली नव्हती. करोना संकटामुळे आधीच होरपळणाऱ्या नागरिकांना दुसरा आर्थिक फटका नको म्हणून महापालिकेने सबुरीचे धोरण स्वीकारले होते. करोनाचा सामान्यांनाही आर्थिक फटका बसल्याने त्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निर्बंध जवळपास हटले आहेत. जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे महापालिकेने थकबाकी वसुलीला वेग दिला आहे.

वेगवेगळय़ा विकास कामांसाठी महापालिकेला पैशांची गरज असते. त्यासाठी कर स्वरुपात मिळणारे उत्पन्न कामी येत असते. त्यामुळेच घरपट्टी आणि पाणीपट्टी थकविणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. ५० हजाराहून अधिक मालमत्ताकर थकीत असणाऱ्यांकडे पालिका कर्मचारी धडक देत आहेत. जाणीवपूर्वक कर न भरणाऱ्यांची पडताळणी केली जात आहे. तसे कुणी आढळल्यास त्यांना सूचना दिली जात आहे. संबंधितांकडून थकीत कराचा भरणा न झाल्यास संबंधित मिळकतींचा लिलाव करण्याची तयारी केली जात आहे. लिलाव प्रक्रियेत प्रतिसाद न मिळाल्यास या मिळकतींवर स्थायी समितीच्या मान्यतेने महापालिकेचे नाव लावण्याचे नियोजन आहे.

विविध कारणांनी महापालिकेच्या खर्चात वाढ होत असताना दुसरीकडे उत्पन्नात मात्र त्या प्रमाणात वाढ होत नाही. थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने खास योजनाही जाहीर केल्या. त्या अंतर्गत दंडाच्या रकमेत सवलत दिली गेली. त्यास मिळकतधारकांकडून काहीअंशी प्रतिसाद मिळाला. तथापि, आजही थकीत कराची रक्कम बरीच मोठी आहे. विकास कामांना चालना देण्यासाठी ती वसूल करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न हाती घेण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhadak campaign tax arrears ysh
First published on: 12-11-2021 at 01:11 IST