धुळे : आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे सरकारी यंत्रणाही आता सोशल मिडियाचा व्यापक वापर करू लागली आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि ट्विटर यांसारख्या माध्यमांचा उपयोग केवळ व्यापार किंवा व्यवसायापुरता मर्यादित न राहता आरोग्य विभागानेही आता त्याचा प्रभावी वापर सुरू केला आहे.
जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम तसेच पहाडपट्ट्यातील नागरिकांपर्यंत त्वरित, अचूक आणि अधिकृत माहिती पोहोचवण्यासाठी आरोग्य विभागाने सोशल मिडियावरील अनुयायी वाढवण्यावर विशेष भर दिला आहे.
आरोग्यसेवा अधिक गतिमान करण्यासाठी विभागाच्या योजना, नियम, संकल्प आणि लोकोपयोगी उपक्रम आकर्षक आणि विश्वसनीय स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचावेत यासाठी अधिकृत खात्यांचा वापर वाढविण्याची रणनीती आखण्यात आली आहे. राज्यभरात डिजिटल माध्यमांचा झपाट्याने वाढणारा प्रभाव लक्षात घेता आरोग्य विभागाने संवाद प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी सांगितले की, दुर्गम भागांतील नागरिकांना योग्य मार्गदर्शन वेळेत मिळावे यासाठी सोशल मिडियाचा वापर अत्यंत उपयुक्त ठरत आहे. अधिकृत खात्यांवरील फॉलोअर्स वाढल्यास आरोग्य संदेश अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.
धुळे जिल्ह्यात अनेक जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ दरम्यान कुष्ठरोग शोध अभियान आयोजित करण्यात आले आहे. कुष्ठरोग प्रसार पूर्णपणे शून्यावर आणण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत त्वचेवरील लालसर किंवा बधीर चट्टे, घाम न येणे, त्वचा जाड होणे, डोळे नीट न मिटणे, तळहात-पाय सुन्न होणे इत्यादी लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्रात तपासणी करावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनिष पाटील यांनी केले.
या मोहिमेसंदर्भात गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शितल शिंदे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आशा कार्यकर्त्या घराघरांत जाऊन नागरिकांची तपासणी करणार असून जनतेच्या सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी समाज माध्यमांचा उपयोग होऊ शकतो असे यावेळी सांगण्यात आले.
आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या अलीकडील बैठकीत राज्यातील आरोग्य जनजागृती मोहिमा अधिक प्रभावी करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर वाढविण्याची गरज अधोरेखित झाली. चुकीची माहिती रोखणे, अधिकृत अद्यतने नियमितपणे पोहोचवणे आणि फॉलोअर्स वाढवून नागरिकांना खात्रीशीर मार्गदर्शन देणे यासाठी विभागातील सर्व यंत्रणांनी समन्वित प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी आरोग्य जनजागृती ही सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगत या नव्या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. ही संपूर्ण मोहीम, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून धुळे जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.
