दिवसेंदिवस खर्चीक होणारी शालेय विद्यार्थी वाहतूक स्वस्त कशी होईल, या संदर्भात उपाययोजना करण्यात येणार असून लहान वाहनांना कमी कर आकारून परवाने देण्याची ‘नाशिक पद्धत’ स्वागतार्ह आहे. सध्या राज्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ३० हजार वाहनांकडे असे परवाने असून त्यांची संख्या वाढविण्यासाठी नाशिक पद्धत राज्यभर राबविण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी येथे दिली. दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ९०० वाहनांना विद्यार्थी वाहतुकीचे परवाने देण्यात येणार असून त्यापैकी १० जणांना प्रातिनिधिक स्वरूपात रावते यांच्या हस्ते परवाने प्रदान करण्यात आले. येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नाशिक शालेय विद्यार्थी वाहतूकदार संघटनांच्या मेळाव्यात रावते यांनी मार्गदर्शन केले. शालेय विद्यार्थी वाहतुकीवर होणाऱ्या खर्चाविषयी रावते यांनी चिंता व्यक्त केली. अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी मोठय़ा प्रमाणावर पैसे घेण्यात येत असल्याने तो खर्च पालकांच्या आवाक्यापलीकडे जातो. त्यामुळे ते रिक्षाचा पर्याय स्वीकारत असले तरी त्यातील धोके अनेक वेळा पुढे आले असल्याचे नमूद करताना रावते यांनी यवतमाळ येथील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाला झालेल्या अपघाताचे उदाहरण दिले. नाशिकमध्ये लहान वाहनांना कमी कर आकारून परवाने देण्याची स्वागतार्ह सुरुवात करण्यात आली असून नियमांमध्ये अशा प्रकारे अजून किती वाहनांना असे परवाने देता येणे शक्य आहे, याचा विचार करण्यात येणार आहे. नाशिक पद्धत राज्यभर राबविण्यासाठी वाहतूक सेनेंतर्गत विद्यार्थी वाहतूक हा स्वतंत्र विभाग कार्यरत करण्यात येईल, असेही रावते यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिवहन खात्यातील रिक्त जागा भरण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. या वेळी खा. हेमंत गोडसे यांनी रावते यांच्या मंत्री म्हणून करण्यात येत असलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिम सय्यद यांनी अल्पावधीत अत्यंत कमी दरात वाहनांना विद्यार्थी वाहतूक परवाने देत विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे सुरक्षित करण्यात आल्याचे सांगितले. वाहतूक सेनेचे सरचिटणीस देवानंद बिरारी यांनी प्रास्ताविकात वाहतूक सेनेची भूमिका मांडली. उदय दळवी, अल्ताफ शेख, बबन घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी आ. राजाभाऊ वाजे, मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर आदी उपस्थित होते.

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwakar raote comment on school bus
First published on: 17-07-2017 at 01:09 IST