आरोग्य विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. गुरूवारी म्हैसेकर यांनी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला.
विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता तसेच श्वसनविकार शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. म्हैसेकर यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती केली. पदभार स्वीकारताना कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ, परीक्षा नियंत्रक डॉ. कालिदास चव्हाण, लेखाधिकारी एन. एस. कळसकर आदी उपस्थित होते. यावेळी म्हैसेकर यांनी विद्यापीठाने आजवर अथक प्रयत्नाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती केल्याचे सांगितले. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व संशोधनाच्या विकासासाठी सातत्याने नवीन उपक्रम राबविण्याचा मानस आहे. तसेच विद्यापीठाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शासन स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. गर्कळ यांनी नवनियुक्त कुलगुरूंचा विद्यापीठाशी याआधीपासून ऋणानुबंध राहिला असल्याचे सांगितले.