सहलीसाठी गेले असतानाची घटना

नाशिक : वनभोजन आणि सहलीचा आनंद लुटण्यासाठी बुधवारी सकाळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली धरण परिसरात गेलेल्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांपैकी आठवर्षांच्या एकाचा धरणाजवळील डोहात बुडून मृत्यू झाला. तर दुसऱ्याला वाचविण्यात शिक्षकांना यश आले. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंबोली येथे शासकीय आश्रमशाळा असून या शाळेत पहिली ते सातवी इयत्तेतील २७२ मुले शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना सहलीचा तसेच वनभोजनाचा आनंद लुटता यावा यासाठी धरण परिसरात सहल काढण्यात आली होती. सहलीत २३३ विद्यार्थी सहभागी झाले. शाळेपासून अवघ्या दीड किलोमीटरवर धरण असल्याने ही सर्व मंडळी पायीच त्या ठिकाणी पोहोचली.

सकाळी १० च्या सुमारास सर्वजण सहलीचा आनंद लुटत असताना वर्गशिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची मोजणी केली असता दोन विद्यार्थी कमी दिसले. त्यांचा शोध घेतला असता धरणाजवळील एका डोहात उत्तम घोंगडे (८, रा. गंगा म्हाळुंगी) हा बाहेर येण्याचा प्रयत्न करताना दिसला. कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने पाण्यातून बाहेर काढले. दुसरा विद्यार्थी रोशन उत्तम लाखन (८,रा. ठाकूरपाडा) हा बुडालेला दिसला. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

उत्तम यास तातडीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.  इतर मुलांना पुन्हा आश्रमशाळेत पोहोचवून या सर्व प्रकाराची माहिती पोलीस तसेच अन्य संबंधित विभागाला देण्यात आली.