म्युकरमायकोसिस रुग्णांची फसवणूक
नाशिक : करोनाचा संसर्ग काही दिवसांपासून कमी होत असतांना जिल्ह्य़ात आता म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर आढळण्यास सुरूवात झाली आहे. हा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आला असला तरी रुग्णालयांविषयी रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये संभ्रम आहे. त्यातच आता आजार नियंत्रणात आणणारे औषधे, इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला आहे. आजारावर प्रभावी ठरणाऱ्या पोझिकन्या झोल या गोळ्यांच्या पाकिटावर १२ हजार ९६० रुपये छापील किंमत आहे. पाकिटातील गोळ्यांची एक पट्टी काढून विक्रेते त्यांची मूळ किंमतीला विक्री करु लागल्याने ही चलाखी रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांचा आर्थिक भुर्दंड वाढवित आहे.
आजारावर उपयुक्त असलेली पोझिकन्या झोल ही गोळी बंद पाकिटात येते. एका पाकिटात साधारणत: २४ गोळ्या असून त्याची किंमत १२ हजार ९६० रुपयेआहे. काही औषध विक्रेत्यांकडून पाकिटातून या गोळीची एक पट्टी काढून पाकीट पुन्हा चिकटवून त्याची विक्री मूळ किंमतीला होत आहे. या माध्यमातून आर्थिक शोषण होत असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. तसेच या औषधाला पर्याय असलेल्या दुसऱ्या द्रवरुप औषधाची किंमत २२ हजार रुपये आहे. ते खपविण्याकरीता या औषधाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन
म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांविषयी काही तक्रार असल्यास थेट अन्न व औषध प्रशासन विभाग, उद्योग भवन येथे संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माधुरी पवार यांनी केले आहे. या संदर्भात काही फसवणूक होत असल्यास अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत उद्योग भवन, आयटी आय सर्कल जवळ, पाचवा मजला, नाशिक किंवा ०२५३- २३५१२०२ या क्र मांकावर रुग्ण किं वा त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा.