अविनाश पाटील

दुष्काळातही सिन्नर तालुक्यातील शहा येथील शेवगा उत्पादक आणि कृषी संशोधक बाळासाहेब मराळे यांनी अत्यंत कमी पाण्यात सहा एकरमधून ५५ टन शेवग्याचे उत्पादन घेतले. योग्य नियोजन केल्यास दुष्काळातही शेती टिकविता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील वावीपासून उत्तरेला आठ किलोमीटरवर शहा हे गाव आहे. केवळ याच वर्षी नव्हे, तर तीन वर्षांपासून हा भाग दुष्काळाला तोंड देत आहे. अशा या दुष्काळी भागात मराळे हे सुमारे एकवीस वर्षांपासून शेवगा शेती करीत आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची त्यांना आवड आहे. संपूर्ण सहा एकरात रोहित-एक या शेवगा वाणाची लागवड करण्यात आली आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करण्यावर त्यांचा भर असतो.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात त्यांनी शेततळे भरून घेतले. त्याच पाण्यावर शेवगा शेती केवळ टिकवलीच, असे नव्हे तर विक्रमी उत्पादनही घेतले. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीतील पहिल्या बहराच्या शेंगांची मुंबईतील निर्यातदारांमार्फत लंडनला निर्यात केली. निर्यातीच्या शेंगांना ६० ते ८५ रुपये किलो बाजारभाव मिळाला. मार्चमध्ये शेततळ्यातील पाणी कमी पडू लागल्याने निर्यात थांबविली. उर्वरित शेंगांची मुंबई बाजारात विक्री केली. त्यास २५ ते ४० रुपये किलो असा दर मिळाला. मेपासून पाणी संपल्याने शेवग्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. सध्या स्थानिक व्यापाऱ्यांनाच २५ रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

शेवग्याचा व्यापारीदृष्टय़ा विचार करून १९९९ पासून मराळे यांनी शेवगा शेतीला सुरुवात केली. एकवीस वर्षांतील अनुभवातून कमी खर्चात, कमी पाण्यात शेवग्याचे गुणवत्तापूर्ण उत्पन्न घेण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले आहे. २०१० मध्ये निवड पद्धतीद्वारे शेवग्याचा रोहित-एक हा वाण विकसित केला.

पाण्याचा ताण सहन करण्याची अधिक क्षमता या वाणात असल्याने कमी पाण्यातही त्याचे भरघोस उत्पादन घेता येते, अशी माहिती त्यांनी दिली. लागवड केल्यापासून अवघ्या सहा महिन्यांत या वाणापासून उत्पादन घेता येते. गर्द हिरवा रंग, ५५ ते ६५ सेंटिमीटर लांबी अशी या वाणाची वैशिष्टय़े आहे. मध्यम लांबीमुळे शेंगांची निर्यात करता येते. वर्षांतून दोन बहर घेता येतात.

प्रचलित पी. के. एम. एक आणि पी. के. एम. दोन या पारंपरिक वाणांपेक्षा रोहित-एक हे वाण ४० टक्के अधिक, तर ओडिशी तीन वाणापेक्षा ३० टक्के अधिक उत्पन्न देते.  देशभरातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीला भेट देऊन शेवगा शेतीसाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे.  शेवगा शेतीतील प्रयोग आणि संशोधनाची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना कृषिभूषण, कृषिरत्न या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.