दुष्काळात पाणी बचतीसाठी निर्णय; कपाळाला रंगाचा टिळा लावणार
रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे.. बुरा ना मानो होली है.. यासह अन्य चित्रपट गीतांच्या तालावर रंगणारे येवल्यातील ‘रंगांचे सामने’ यंदा पाणीटंचाईच्या संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साठवण तलावाने गाठलेला तळ, पाणीपुरवठय़ात कपात या स्थितीत रंगपंचमीच्या दिवशी खेळण्यात येणाऱ्या सप्तरंगी रंगाच्या सामन्यांऐवजी टिळा लावून हा सण साजरा करण्याचे उत्सव समितीने निश्चित केले आहे. येवलावासीयांचा हा निर्णय शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वासाठी आदर्श घेण्यासारखा आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत नसेल अशी येवल्यात रंगपंचमी साजरी केली जाते. दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्यात पाण्याअभावी अनेक समस्या निर्माण होतात. या अडचणींवर मात करत गावकऱ्यांनी रंगांची मुक्तहस्ते उधळण करणाऱ्या रंगपंचमीनिमित्त ही कसर भरून काढण्यासाठी ‘रंगांचे सामने’ ही अनोखी परंपरा सुरू केली. शेतातील साठवलेले पाणी पिंपात भरून बैलगाडीद्वारे येवले शहरात आणण्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. पैठणीचा पक्का रंग उकळून चाचणी करून तो पिंपात भरला जात असे. क्षमतेप्रमाणे बैलगाडीवर दोन किंवा चार पिंप भरले की, त्यावर विविध तालमीचे पहिलवान मंडळी आरूढ होत. बैलगाडीवरील ही पहिलवान मंडळी त्यांच्या तालमीचा जयघोष करीत असे. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात कलगी तुराप्रमाणे परस्परांवर रंगीत पाण्याचे फवारे मारण्याची पद्धत आहे. कालानुरूप बैलगाडीची जागा ट्रॅक्टरने घेतली. दुसरीकडे ही रंगाची रंगपंचमी देवतांबरोबर खेळण्याचाही प्रघात आहे. २५० वर्षांपासून ही परंपरा येवलावासीय जपत आहेत. त्यात शहराचे प्रतिनिधित्व शेठ गंगाराम छबिलदास यांची पिढी करते. होळी ते रंगपंचमीपर्यंत भगवान बालाजीची यात्रा भरते. यंदा रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी शेठ छबिलदास यांच्या घरातील भूषण पटेल देवांबरोबर रंगपंचमी खेळणार आहेत. त्यात सुवासिक फुलांचा रस, चंदन, केशर याचा उपयोग करत मंदिरातील पूजारी गुलालाची उधळण करतात.
मध्यंतरी सहा ते सात वर्षे काही वैयक्तिक वादामुळे रंगाचे सामने बंद झाले होते. मात्र १९९६ पासून येथील समाजसेवक तथा व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या पुढाकाराने ही परंपरा पुन्हा सुरू झाली. दोन वर्षांपूर्वी पाणीटंचाई असल्याने सामने रद्द झाले होते. त्यावेळी साठवलेले पाणी राजापूर येथील तहानलेल्या हरणांना टँकरने पोहोचविण्यात आले. यंदाही उत्सव समितीने सामने रद्द करत रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता टिळक मैदानातकोरडा टिळा लावून साध्या पद्धतीने खेळण्याचे ठरवले आहे.
तसेच रीतिरिवाजाप्रमाणे मिरवणूक आणि वेताळाचा नाच होईल. वन्य प्राण्यांसाठी यंदाही साठवलेले पाणी टँकरद्वारे दिले जाणार असल्याचे झळके यांनी सांगितले. या संदर्भात नुकतीच समितीची बैठक झाली. यावेळी किशोर सोनवणे, रुपेश लोणारी, भोलानाथ लोणारी, अविनाश कुक्कर आदींसह विविध आखाडे, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पावसाअभावी यंदा संपूर्ण जिल्ह्यात टंचाईच्या संकटाने भयावह स्वरूप धारण केले आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू आहे. या स्थितीत रंगपंचमीला होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी येवलावासीयांनी घेतलेला निर्णय सर्वासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.