परराज्यातून महाराष्ट्रात येणारे पर्यटक आणि भाविकांना करोना चाचणी आवश्यक करण्यात आल्याने त्याचा परिणाम देवस्थान, पर्यटन स्थळांवर होणाऱ्या गर्दीवर झाला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानही यास अपवाद नाही. मंदिरे उघडून सात दिवस होऊनही अद्याप स्थानिक अर्थकारणाला गती मिळालेली नाही. त्यामुळे व्यावसायिक, दुकानदारांमध्ये नाराजी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकांच्या सततच्या मागणीमुळे धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे खुली करण्यात आली आहेत; परंतु अद्याप अर्थकारणाला अपेक्षित गती मिळालेली नाही. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वरही यास अपवाद नाही. त्र्यंबकेश्वर देवस्थानाभोवती संपूर्ण शहरासह परिसरातील गावांचे अर्थकारण अवलंबून आहे. या ठिकाणी पूजेचे साहित्य, कपडा दुकान, प्रसादाची दुकाने आहेत. तसेच पूजेसाठी पुजाऱ्यांकडे मुक्कामी राहणाऱ्या भाविकांची ऊठबस सांभाळण्यासाठी पुरोहितांच्या घरी स्वयंपाक, घरकामासाठी काही जण राबत असतात. नारायण नागबळी, त्रिपिंडी पूजेसाठी देशविदेशातून भाविक या ठिकाणी येतात.

मंदिरे खुली झाल्याने या ठिकाणी प्रशासकीय नियमांचे पालन करून पूजा सुरू झाल्या आहेत; परंतु दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यांतून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे, रस्तेमार्गाने येणाऱ्या प्रवाशांना करोना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल आवश्यक करण्यात आला आहे. अहवाल सकारात्मक असेल तरच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे संबंधित राज्यांतून त्र्यंबकला येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर याचा परिणाम झाला आहे. स्थानिक व्यवसायांनाही त्याचा फटका बसला आहे. मंदिर परिसरात भाविकांची तसेच पर्यटकांची संख्या मर्यादित असल्याने आर्थिक उलाढालीला फारशी चालना मिळालेली नाही. मंदिरे सुरू झाल्यावर गर्दी वाढेल, या अपेक्षेने अनेकांनी उधार-उसनवारी करून सामग्री भरली आहे; परंतु गर्दी नसल्याने व्यावसायिकांसह अन्य घटकांवर तिष्ठत बसण्याची वेळ आली आहे.

यासंदर्भात पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी म्हणाले, ‘‘त्र्यंबक देवस्थान परिसरात भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. पूजेसाठीही आवश्यक नियमावलीचे पालन सुरू आहे; परंतु अद्याप अपेक्षित गर्दी झालेली नाही.’’ गुजरातमधून आरोग्य तपासणी करून नागरिकांना बाहेर सोडले जात असल्याने गुजरातकडील पर्यटक, भाविकांची संख्या कमी आहे. केवळ अर्ध्या तासात दर्शन घेऊन लोक बाहेर पडत आहेत, असेही गायधनी यांनी नमूद केले.

उलाढाल यथातथाच : मंदिर परिसरात भाविकांची तसेच पर्यटकांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे आर्थिक उलाढालीला फारशी चालना मिळालेली नाही. मंदिरे सुरू झाल्यावर गर्दी वाढेल, या अपेक्षेने अनेकांनी साधनसामग्री भरण्यासाठी उधार-उसनवारी केली; परंतु भाविक-पर्यटकांअभावी व्यावसायिक आणि इतरांचे नुकसान होत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economic cycle in the trimbakeshwar temple area has slowed down abn
First published on: 27-11-2020 at 00:14 IST