आरोग्य विद्या शाखांमध्ये अहंकार

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाष्य

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाष्य

नाशिक : आरोग्य विज्ञानातील वेगवेगळ्या शाखांमधील (पॅथी) अहंकार ज्ञानाचे आदान-प्रदान होऊ देत नाही. हे ज्ञान जनतेपासून लपवण्यास अहंकार कारणीभूत ठरतो. सर्व विद्या शाखांमध्ये ज्ञानाचे आदान-प्रदान महत्त्वाचे आहे. या क्षेत्रातील समग्र ज्ञानाचा विचार करून प्रत्येक विद्याशाखेत आणखी वेगळे काय करता येईल, याचा विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली. याकरिता भारतीय आयुर्वेदशास्त्राने पुढाकार घेतल्यास जग त्यांचे अनुकरण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आयुर्वेद व्यासपीठाच्या चरक सदन या नूतन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी करोनाकाळातदेखील आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित झाल्याचे नमूद केले. इतर विद्याशाखा आजारपणाचा विचार करतात, पण आयुर्वेद निरोगीपणाचा विचार करते. प्राथमिक आणि द्वितीय स्तरावर अतिशय कमी खर्चात सर्वाना उपचार देण्याची आयुर्वेदशास्त्राची क्षमता आहे. भारतासारख्या देशात पावणेसात लाख गावांमध्ये याच स्तरावर योग्य उपचार देण्याचे काम आयुर्वेद करू शकते. आयुर्वेदाची आवश्यकता जगात मानली जाते. त्याचा प्रचार, प्रसार करून सर्वाना निरामय बनविण्यासाठी व्रतस्थ प्रयत्नांची गरज आहे. आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्यांनी तसे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

चांगले लोक एकत्र येऊन काम करीत नाहीत. त्यांच्यात नाव, झेंडय़ांचा प्रश्न असतो. संस्थात्मक अहंकार असतो. आयुर्वेदशास्त्रातील तज्ज्ञांनी अशा अहंकारापासून दूर राहावे. सर्वाना एकत्र जोडून आपले कार्य पुढे नेण्याचा आदर्श ठेवावा, अशी अपेक्षा डॉ. भागवत यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात भारतीय चिकित्सा पद्धती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आयुर्वेद व्यासपीठाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी केंद्रीय उपाध्यक्ष वैद्य जयंतराव देवपुजारी यांचा सरसंघचालकांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

काल्पनिक आजार अन् औषधविक्री

काही काळ असत्य चालत असते. जगात असे घडते, हे सर्वाना ज्ञात आहे. काल्पनिक आजार होतात. काही काल्पनिक औषधांची विक्री केली जावी म्हणून प्रचार केला जातो. विविध उत्पादन खपविण्यासाठी जाहिराती केल्या जातात, याचे दाखले सरसंघचालकांनी मांडले. तत्पूर्वी नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी काही गोष्टी धैर्याने समजावून द्याव्या लागतील. १०-१५ वर्षांपूर्वी देशी गाय, पंचगव्य यावर चर्चा केली तरी लोक हसायचे. त्यावर संशोधनाअंती पेटंट मिळाले. त्याचे महत्त्व पटून वापर सुरू झाला. वास्तव लोक स्वीकारतात. त्यासाठी प्रयोग करावे लागतात, याकडे डॉ. भागवत यांनी लक्ष वेधले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ego in the branches of health sciences says rss chief mohan bhagwat zws