खात्यातून लाखभर रुपये काढताना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार

कोणत्याही निवडणुकीत पैशांची मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असल्याने निवडणूक कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करत जबाबदारीने काम करावे. बँकेत होणाऱ्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवून त्याचे नियमित अहवालदेखील सादर करण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक खर्चाबाबतच्या आढावा बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे, तहसीलदार प्रशांत पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मांढरे यांनी निवडणूक आचारसंहिता कालावधीत बँक खात्यातून आरटीजीद्वारे  एका बँक खात्यातून अनेक व्यक्तींच्या खात्यात रक्कम जमा होण्यावरही बँकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खातेदाराच्या किंवा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या खात्यात जमा करणे किंवा काढणे यासाठी संबंधित खातेदाराने प्रतिज्ञापत्र बँकेकडे सादर करणे गरजेचे आहे, असे मांढरे यांनी नमूद केले.  निवडणूक काळात अवैध रोकड नियंत्रणासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार एटीएम यंत्रात रोकड जमा करताना वाहतुकीसाठी एसओपीचा वापर करावा.  तसेच निवडणूक काळात खासगी विमान, हेलिकॉप्टर यांची सेवा पुरविताना नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवाशाच्या बॅगेची तपासणी करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

निवडणूक कालावधीत राजकीय पक्षांकडून एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणे किंवा काढणे तसेच उमेदवारांच्या खात्यातून १० लाखांहून अधिक रक्कम काढणे किंवा जमा करण्याची माहिती मिळाल्यास त्यासंदर्भात आयकर विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या.