scorecardresearch

Premium

प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचा जोर

नांदगाव येथे आयोजित सभेत समाज विकास पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.

maratha vidya prasarak samaj nashik
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था

मविप्र निवडणूक

मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाची घटीका जशी समीप येत आहे, तसे आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले आहे. ठिकठिकाणी चाललेल्या प्रचार सभांमध्ये परस्परांवर आगपाखड केली जात आहे. त्या त्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना आपल्या सोबत ठेवण्यासाठी दोन्ही पॅनलची धडपड सुरू आहे. यामुळे काही पॅनलच्या व्यासपीठावर कट्टर विरोधक असणारे आजी-माजी आमदार एकत्र आल्याचे दृष्टिपथास पडतात. सोमवारी निफाड तालुक्यातील प्रचारसभांमध्ये एकत्रित असणारे शिवसेनेचे आ. अनिल कदम आणि माजी आमदार राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिलीप बनकर हे त्याचेच उदाहरण.

नेहमीप्रमाणे यंदाही पारंपरिक विरोधक परस्परांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत. मविप्र संस्थेच्या २१ जागांसाठी एकूण ५२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत मतदान होणार आहे. १४ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. प्रचाराला अल्पसा कालावधी असल्याने उमेदवारांनी सभासदांपर्यंत पोहोचण्याची धडपड चालवली आहे. विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनल आणि विरोधी माजी खासदार प्रताप सोनवणे व अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी समाज विकास पॅनलने प्रचाराला वेग दिला आहे. सोमवारी ठिकठिकाणी सभांच्या माध्यमातून दोन्ही पॅनलचे उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी मतदारांशी संवाद साधला. या निमित्ताने राजकीय विरोधक एकत्र आल्याचे दिसत आहे.

अनेक तालुक्यांमध्ये आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर दिसतात. प्रगती पॅनलने सोमवारी निफाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सभासदांच्या बैठका घेतल्या. या वेळी राजकीय क्षेत्रातील परस्परांचे कट्टर विरोधक सेनेचे आमदार अनील कदम आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर एकाच व्यासपीठावर दिसले. इतर तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात असे घडत असून या निवडणुकीने मराठा समाजातील मातब्बरांना एकत्र आणले आहे.

नांदगाव येथे आयोजित सभेत समाज विकास पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. केजीपासून पीजीपर्यंत शिक्षणाचे व्रत घेतलेल्या मविप्र शिक्षण संस्थेत एकाधिकारशाही आहे. जिल्हय़ाबाहेरील सत्ताकेंद्र प्रवेश प्रक्रियेपासून वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत धुमाकूळ घालत असल्याचा आरोप अ‍ॅड. ठाकरे यांनी केला. कोटय़वधींची जमीन खरेदी चढय़ा दराने केली गेली. बांधकामापासून ते पायाभूत सुविधांपर्यंतचे निर्णय कार्यकारिणीला न जुमानता घेतले गेले. भ्रष्ट पद्धतीच्या कारभाराविरोधातील लढाईत सभासदांनी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रताप सोनवणे यांनी आजवर नात्यागोत्याच्या मदतीने राजकारण करणाऱ्या, सत्तासंपत्ती मिळवणाऱ्या विद्यमान सरचिटणीसांनी अचानक कसमादेतील सभासदांना नातीगोती बाजूला ठेवण्याची भाषा सुरू केल्याचे नमूद केले. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावरून लक्ष विचलित करण्यासाठी सभासदांच्या मनात विष पेरण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला.

विरोधकांच्या आरोपांना प्रगती पॅनलने प्रत्युत्तर दिले. भ्रष्टाचाराचे आरोप नीलिमा पवार यांनी खोडून काढले. संस्था हे मंदिर आहे. मंदिरातील दानपेटीत पैसे टाकले जातात, कोणी त्यातून पैसे काढत नाही, असा टोला त्यांनी लगावला. संस्थेचा कारभार स्वीकारल्यानंतर स्वत:चे दोन व्यवसाय बंद करावे लागले. संस्थेची प्रामाणिकपणे प्रगती करण्यात आली. ठेवी लक्षणीय वाढल्या.

या काळात ३०० एकर जमीन खरेदी करण्यात आली. त्यातील १८२ एकरचे खरेदीखत तर उर्वरित जमिनीचे साठेखत झाले आहे. काही मंडळी आपण संस्थेचे सभासद नसल्याचा आरोप करतात; परंतु त्यात तथ्य नाही. १९८९ मध्ये आपण संस्थेचे सभासद झालो असल्याचे पवार यांनी सांगितले. आ. कदम यांनी कोणाचा विश्वास बसणार नाही अशी संस्थेची प्रगती झाल्याचे नमूद केले. मविप्र संस्थेत डॉ. वसंत पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी नीलिमाताई यांनी भरून काढल्याचे त्यांनी यांनी सांगितले. बनकर यांनीही या वेळी प्रगती पॅनलने मागील पंचवार्षिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याचे नमूद केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election in maratha vidya prasarak samaj nashik

First published on: 08-08-2017 at 02:28 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×