निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

ज्या मतदारसंघात कमी क्षेत्रात दाट लोकवस्ती आहे, अशा ठिकाणी गैरप्रकार रोखण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर केला जाणार आहे. यात मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य़सह इतरही मतदारसंघांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शुक्रवारी येथे देण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक आरती सिंह, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.  मालेगाव बाह्य़ मतदारसंघाची लोकसंख्या तीन लाख ३९ हजार ७१, तर मालेगाव मध्यची लोकसंख्या दोन लाख ९१ हजार ६०३ इतकी आहे. कमी क्षेत्रफळात दाट वस्तीचे हे मतदारसंघ आहेत. दाट लोकवस्तीच्या भागात मतदारांना प्रलोभन दाखवणे, त्यांच्यावर दबाव आणणे असे प्रकार घडू शकतात. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी अशा लोकवस्तीच्या परिसरात ड्रोनमार्फत नजर ठेवली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी सांगितले.  गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींवर पोलिसांनी कारवाई सुरू केली असून त्या अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी ५० गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत तसेच प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असून गुजरातहून पुण्याकडे नेला जाणारा २६ लाखांचा अवैध गुटखा पकडण्यात आला. परवानाधारक शस्त्र जमा करण्याचे कामही हाती घेण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘मतदान गोपनीय न राखल्यास गुन्हा’

लोकसभा निवडणुकीत एका युवकाने मतदान करतानाचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमावर टाकले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. वास्तविक मतदान हे गोपनीय असते. केंद्रात किंवा मतदान करताना छायाचित्र काढणे, चित्रीकरणास प्रतिबंध आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना ही माहिती नसते. त्यांच्यामार्फत उत्साहात अशा चुका घडू शकतात. विधानसभा निवडणुकीत केंद्रात भ्रमणध्वनी नेण्यास, वापर करण्यास प्रतिबंध आहे. कोणीही भ्रमणध्वनीवर सेल्फी वा चित्रीकरणाचा प्रयत्न करू नये. तसे आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे आरती सिंह यांनी सांगितले.