‘महावितरण’ची कारवाई; अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन

नाशिक : ‘महावितरण’च्या मालेगाव मंडळ अंतर्गत असलेल्या नाशिक-सटाणा मार्गावरील दह्याणे शिवारातील मे.भांगडिया अ‍ॅग्रोकडून होणारी वीज चोरी ‘महावितरण’पथकाच्या तपासणीत उघड झाली. ही चोरी ७५ हजार ७६८ युनिट्सची असून याची एकूण किंमत १३ लाख ६९ हजार रुपये आहे. 

मे. भांगडिया अ‍ॅग्रो यांच्याकडून विद्युत मीटरच्या वायरमध्ये फेरफार करून दूरनियंत्रकाच्या साहाय्याने वीज चोरी करण्यात येत होती.  सटाणा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कारखान्याचे मालक प्रदीप भांगडिया आणि किशोर भांगडिया यांच्याविरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

उच्चदाब ग्राहक भांगडिया अ‍ॅग्रोचा शेंगदाणे काढणीचा कारखाना असून मंजूर वीजभार हा १८० केव्हीए असा आहे. ग्राहकाचा वीज वापर संशयास्पद वाटल्यामुळे चाचणी विभाग मालेगाव तसेच सटाणा विभाग यांच्या पथकाने सदर ग्राहकाच्या विद्युत मीटरची सखोल तपासणी केली. ग्राहकाने उच्चदाब मीटरमध्ये येणाऱ्या वायरमध्ये फेरफार करुन वीज वापराची नोंद मीटरमध्ये होणार नाही, अशी व्यवस्था करून वीज चोरी केल्याचे उघड झाले.

 नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मालेगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता रमेश सानप यांच्या नेत्तृत्वाखाली करण्यात आलेल्या या तपासणीमध्ये मालेगाव चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता चंदन तल्लरवार, सटाणा विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश बोंडे, चाचणी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता छगन थैल्ल, मालेगाव मंडळ उपकार्यकारी अभियंता अश्विनी इष्टे. ए. आर. आहिरे, सहाय्यक अभियंता एस. बी. राठोड सहभागी झाले होते. ग्राहक भांगडिया यांनी वीजचोरीच्या रकमेचा भरणा केला आहे.

नाशिक परिमंडलात वीज चोरांविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली असून बेकायदेशीरपणे वीज वापर करणाऱ्यांवर ‘महावितरण’चे लक्ष ठेवून आहे. वीज चोरी करणाऱ्याला कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही क्लृप्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करू नये, तसेच आकडे टाकून वीजचोरी करणे थांबवून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.