नांदगावमधील पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

नाशिक : नांदगांवसह तालुक्याचे पूर परीस्थितीपासून कायमस्वरुपी संरक्षण होण्यासाठी शाश्वत उपाय योजनांचे नियोजन करुन, टप्प्या-टप्प्याने त्या प्राप्त निधीनुसार राबविण्यात याव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली आहे.

मांढरे यांनी नांदगावमधील पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली, यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या सूचना केल्या. यावेळी आमदार सुहास कांदे, उपविभागीय अधिकारी सोपान कासार, तहसीलदार दीपक पाटील आदी उपस्थित होते.

सरकारकडे योग्य भरपाईची मागणी सादर करण्यासाठी, तलाठ्यांकडून करण्यात येत असलेल्या पंचनाम्यांची पडताळणी, क्षेत्रिय स्तरावर ई-पीक पाहणीची अमलबजावणी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा केला. मागील आठवड्यात शाकंबरी आणि लेंडी नदीला पूर आल्याने मनमाड शहरातील अनेक घर आणि दुकानांचे नुकसान झाले. शाकंबरी नदीवरील वाहून गेलेल्या पुलाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. या  पुलाच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

नदीचे पात्र गाळामुळे अरुंद झाले आहे. पात्र रुंदीकरणासाठी नगर विकास विभागाकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर करून, आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या दरम्यान लेंडी नदीवरील जोडणाऱ्या पुलास कठडे बसविणे, घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे जाणारा रस्ता दुरुस्ती, रेल्वे भुयारी मार्गामुळे साचलेले पाणी गावात येत असल्याबाबत रेल्वे विभागाशी बैठक घेणे, लेंडी नदीपात्रात नागरीकांनी टाकलेल्या टपऱ्या कायमस्वरुपी काढून टाकणे, टपरीधारकांना पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव तयार करुन त्यांना सुवर्ण जयंती रोजगार योजनेतून कर्ज उभारुन देण्याचा प्रस्ताव नगर परिषदेने तयार करण्याची सूचनाही मांढरे यांनी केली.

नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील मौजे साकोरा येथे सर्जेराव छत्रे , गिरीधर सुरसे, दिगंबर सुरसे  यांच्या शेतांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तलाठी यांनी केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची पडताळणी केली. साकोरा गावाजवळील मोरखडी पाझर तलावाचा बांध फुटल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

ई-पीक पाहणी अ‍ॅपचे प्रात्यक्षिक 

ई- पीक पाहणी अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबपर्यंत आपल्या पिकांची ई- पीक पाहणी नोंदणी करुन घेण्याचे आवाहन मांढरे  यांनी केले. मौजे गंगाधरी येथील शेतकरी जयंत जुन्नरे, सुनील जुन्नरे यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी अ‍ॅपवर प्रात्यक्षिक केले. येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.