प्रकाश जावडेकर यांना चिंता; प्लास्टिकमुक्त उपक्रमांचा शुभारंभ
एकीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून नव्या संस्कृतीचा उदय होत असताना शहरात प्लास्टिकची समस्या मात्र गंभीर झाली आहे. शहरांमध्ये हजारो टन जमा होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारी पर्यावरणाची हानीबाबत चिंता व्यक्त करून देश प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प सरकारने केला असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
मंगळवारी नाशिकरोड येथे जेलरोड परिसरात प्लास्टिकमुक्त कचरा स्वच्छता उपक्रमांचा शुभारंभ जावडेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, आ. बाळासाहेब सानप आदी उपस्थित होते. जावडेकर यांनी शहरातील प्लास्टिक कचऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. शहर लहानमोठे असो. सारासारविचार केला तर त्या ठिकाणी दररोज १५ हजार टन प्लास्टिक जमा होते. त्यापैकी फक्त नऊ हजार टन गोळा केले जाते.
वर्षांला वीस लाख टन प्लास्टिक तसेच राहते. इतरत्र फेकून दिलेले हे प्लास्टिक जनावरे तसेच समुद्रातील माशांच्या पोटात जाते. पर्यावरणाचीही मोठी हानी होते. त्यामुळे देश प्लास्टिकमुक्त करण्याचा विडा सरकारने उचलला आहे. हे केवळ प्रशासनाचे काम नाही तर त्यात लोक सहभाग महत्त्वाचा आहे. नाशिक हे विकसित शहर असले तरी स्वच्छतेबाबत इंदूर भारतात प्रथम आले आहे. याचा विचार महापालिका प्रशासनाने करणे गरजेचे असल्याच्या कानपिचक्या त्यांनी दिल्या.
नाशिकला देशात क्रमांक एकवर येण्यासाठी लोकसहभागातून उपक्रमांची आखणी करणे आवश्यक ठरणार आहे. प्लास्टिकमुक्त भारत हे समाज बदलण्याचे आंदोलन असून त्याचा शुभारंभ नाशिकमधून झाला आहे. ही नाशिकच्या विकासाची सुरुवात आहे. पंतप्रधानांचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करावे असे आवाहन जावडेकर यांनी केले. प्लास्टिकमुक्त अभियानासाठी पुढील सहा महिने नगरसेवक व नागरिकांनी मोहीम राबवावी. त्याचा आढावा घेण्यासाठी आपण नाशिकला येणार आहोत.
नाशिककर सिंगापूर किती स्वच्छ आहे हे पाहण्यास जातात. मात्र, अशी स्वच्छता ठेवा की परदेशी लोक नाशिक पाहण्यासाठी यायला हवेत. पुण्यात शाळा, महाविद्यालयात प्लास्टिक मुक्तीचा प्रयोग आम्ही यशस्वी केला. नाशिकमध्येही हे व्हावे यादृष्टीने सूक्ष्म नियोजन गरजेचे असून हे कसे अमलात येऊ शकेल याबद्दल त्यांनी माहिती दिली.
दरम्यान, जावडेकर यांच्या हस्ते सकाळी जेलरोडच्या शिवाजी पुतळ्याला पुष्पहार घालून प्रभाग १८ मधील स्वच्छता आणि प्लॅस्टिक मुक्त मोहिमेला प्रारंभ केला. शिवाजी पुतळा, पवारवाडी, मोरे मळा, बालाजी नगर, एकता कॉलनी, वसंत विहार, रेल्वे स्थानक आदी भागात स्वच्छता करण्यात आली. याच परिसरात असलेल्या नाशिकरोड बसस्थानकाला जावडेकर यांनी अचानक भेट दिल्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. जागोजागी उडालेल्या तंबाखूच्या पिचकाऱ्या, जनावरांचा मोकाट वावर, छोटय़ा विक्रेत्यांचा ठिय्या, बस स्थानक परिसराची दुरावस्था पाहता जावडेकरांनी दुकानदारांना कचरा पेटी ठेवण्याचे तसेच प्रवाशांना स्वच्छतेविषयी सूचना देत निघून जाणे पसंत केले.