कृषिमंत्री दादा भुसे यांची ग्वाही

नाशिक : शेतकऱ्यांनी करोनासारखी आपत्ती, तसेच अतिवृष्टी किंवा दुष्काळासारखे संकट अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. शेतमालाची निर्यात मोठय़ा प्रमाणत वाढावी, यासाठी राज्यस्तरावर कृषी विभागामार्फत कृती दल गठीत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

गुरूवारी येथील पंचायत समितीत आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याावेळी भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, मालेगावचे उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, नाशिक गटविकास अधिकारी डॉ.सागरीका वारी आदी उपस्थित होते.

रानभाज्यांची ओळख आणि संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान असून रानभाज्यांना आयुर्वेदात अनन्यसाधारण आहे. ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील नागरीकांनाही त्यांची माहिती मिळावी हा रानभाज्या महोत्सव सप्ताहाचा उद्देश आहे. रानभाजी महोत्सव एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता पावसाळ्यात दर रविवारी किंवा महिन्यातून किमान एक किं वा दोनवेळा याचे आयोजन करण्याची सूचना भुसे यांनी के ली.  शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना आपला पत्ता किंवा संपर्क क्रमांकही उपलब्ध करून द्यावा. जेणे करून नागरीकांना जेव्हां पाहिजे असेल तेव्हा ते आपल्याशी संपर्क साधून रानभाजी विकत घेवू शकतील. तसेच कृषि विभागाने या आदिवासी शेतकऱ्यांशी संवाद साधून सदर रानभाज्यांची माहिती ही पुस्तक स्वरूपात तयार करून जतन करावी, अशा सूचना भुसे यांनी के ल्या.

यावेळी रानभाज्यांचे संवर्धन, संकलन, प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्र आणि वृक्षाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.