मालेगाव : मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघातील ‘मत चोरी’ विषयावरुन माजी आमदार आसिफ शेख यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ‘मत चोरी’च्या कथित गैरप्रकाराचे खापर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यावर फोडताना मालेगावातील जवळपास ५० टक्के बीएलओ. विशिष्ट राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले गेल्याचा आरोप शेख यांनी केला.
मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात ४२ हजारावर बनावट मतदार नोंदविण्यात आल्याचा शेख यांचा आरोप आहे. ही मत चोरी सिद्ध करुन देण्यासाठी आपण समर्थ आहोत, असे आव्हान त्यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. या पार्श्वभूमीवर शेख यांनी मुंबईत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी त्यांनी निवेदन दिले.आरोपांच्या पुष्ठ्यर्थ काही पुरावेही दिले. यादीत नाव नोंदविताना मतदारांचा पत्ता आवश्यक असतो. परंतु, कोणताही पत्ता नसलेल्या जवळपास २८ हजार मतदारांची नावे मतदार संघात अस्तित्वात असल्याची तक्रार त्यांनी केली. पत्त्याच्या रकान्यात कोरी जागा, एक शुन्य, दोन शुन्य किंवा नुसती रेष असे प्रकार असल्याचे त्यांनी निवडणूक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
यादीत ११ हजारांहून अधिक मतदारांची दुबार किंवा तिबार नावे आहेत. तसेच साडेतीन हजारावर मतदारांची छायाचित्रे अस्पष्ट असल्याचे शेख यांनी सांगितले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघात तब्बल ४० हजारावर मतदारांची भर पडली. जेमतेम सहा महिन्याच्या कालावधीत एवढ्या मोठ्या संख्येने मतदार वाढ कशी होऊ शकते, याबद्दल शेख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मतदार यादीत बनावट नावे समाविष्ट असणे, याला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) जबाबदार असल्याची तक्रार शेख यांनी केली. ५० टक्के बीएलओंनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. मात्र काही जणांनी विशिष्ट राजकीय पक्षाला मदत होईल, अशी भूमिका निभावल्याचे दिसत आहे. अशा बीएलओंची यादी आपल्याकडे असल्याचा दावा शेख यांनी केला.
ऑनलाईन मतदार नोंदणी केल्यावर अर्जदाराने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्याची जबाबदारी बीएलओंची असते. मात्र तसे केले गेले नसल्याने मालेगावात मोठ्या प्रमाणावर बनावट मतदार समाविष्ट झाले, असा आक्षेप शेख यांनी घेतला. बनावट मतदारांची नावे वगळण्यात यावीत तसेच दोषी बीएलओंवर कारवाई करावी, असा आग्रह शेख यांनी धरला. या मागणीसाठी शुक्रवारी मालेगावात जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देखील शेख यांनी दिला आहे.