साहाय्यक उपनिरीक्षक परीक्षेत घडय़ाळ, पाकीट बाळगण्यास मनाई

केंद्रीय निवड आयोगातर्फे सोमवारी घेण्यात आलेल्या परीक्षार्थीना परीक्षा देताना हातातील साध्या घडय़ाळापासून ते अगदी खिशातील पाकिटापर्यंत सर्व वस्तू तुमच्या जबाबदारीवर वर्गाबाहेर ठेवा, असे निर्देश केंद्रात प्रवेश करताच मिळताच पेपर लिहिताना विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला अशी परिस्थिती येथे निर्माण झाली होती. यावरून परीक्षार्थी आणि केंद्रातील कर्मचारी यांच्यात शाब्दिक वादही झडले.

केंद्रीय निवड आयोगातर्फे सोमवारी दिल्ली पोलीस, केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील साहाय्यक उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा घेण्यात आली. संपूर्ण विभागात या परीक्षेसाठी नाशिक हे एकमेव केंद्र होते. परीक्षा सकाळी १० ते दुपारी १२ या दोन तासात होणार होती. परीक्षार्थीनी साडेआठपर्यंत केंद्रावर हजर व्हावे, असे निर्देश प्रवेशपत्रावर दिले गेले. यामुळे बाहेरगावहून आलेले आणि स्थानिक विद्यार्थी सकाळीच म्हसरूळ रस्त्यावरील प्रो स्कील कन्सल्टंटच्या केंद्रावर पोहोचले. आलेल्यांना प्रारंभीच तारस्वरात सूचना दिल्या गेल्या. परीक्षा देताना कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही. हातातील घडय़ाळ, खिशातील पाकीट, कंगवा व इतर साधने वर्गाबाहेर ठेवावीत, असे सांगितले गेले.

या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी विचारणा केल्यावर वरिष्ठ स्तरावरील सूचनेनुसार हे र्निबध लादण्यात आल्याचे सांगण्यात आले. वस्तू गहाळ झाल्यास आम्ही जबाबदार नाही असे उर्मट भाषेत सांगण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. यापूर्वी याच ठिकाणी अशा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी असे वारंवार घडत असल्याचे सांगितले. भ्रमणध्वनी व किमती वस्तू बाहेर ठेवण्यास कोणी नकार दिला नाही. परंतु, या वस्तू सुरक्षित राहतील याची व्यवस्था केली गेली नाही. वेळेत पेपर लिहून व्हावा म्हणून घडय़ाळ महत्त्वाचे असते. परंतु, ते देखील बाळगू दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षार्थी आणि कर्मचाऱ्यांत शाब्दिक वाद

परीक्षेपूर्वी आपल्याजवळील वस्तू ठेवण्यास सांगताना त्या सुरक्षित राहाव्या अशी कोणतीच तजवीज करण्यात आली नव्हती. वर्गाबाहेर सुरक्षित जागा नसल्याने या वस्तू लंपास झाल्यास काय करणार, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. पेपर लिहिताना भ्रमणध्वनी जवळ न बाळगणे समजू शकते. परंतु, घडय़ाळ व पैशांचे पाकीटही बाहेर ठेवण्यास सांगितल्याने विद्यार्थी धास्तावले. परीक्षेत नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर जिल्ह्य़ातील जवळपास १०० विद्यार्थ्यांचा समावेश होता. काही जणांकडे बॅगही होती. परंतु, केंद्राबाहेर ठेवण्यास सुरक्षित जागा नव्हती. जिन्याच्या खालील जागेत विद्यार्थ्यांनी आपले साहित्य ठेवत कसाबसा पेपर सोडविला. त्यांचे अर्धे लक्ष पेपरमध्ये तर अर्धे लक्ष बाहेर ठेवलेल्या साहित्याकडे होते.