लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत परीक्षकांचे प्रतिपादन
नाशिक : एकांकिका किंवा नाटक म्हणजे केवळ अभिनय नाही. तर लेखकाने मांडलेला विचार अभिनय किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे होय. यासाठी आपल्या घरात असलेला ‘इडियट बॉक्स’ खूप मोठा गुरू आहे. वेगवेगळ्या मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून कलावंत अभिनय, विषय मांडणी कशी असावी याचे धडे देत असतात. ते समजून घेणं गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीत परीक्षकांनी केले.
येथील महाकवी कालिदास कलामंदिरातील अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या सभागृहात नाशिक विभागीय प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली. स्पर्धेत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील संघानी सहभाग घेतला. स्पर्धकांनी आपले सामाजिक भान ठेवत वृध्दांचे पालकत्व, भारत-पाकिस्तान फाळणी, सूडावर आधारीत रहस्यमय एकांकिका, विद्यार्थी निवडणुका, नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या, सद्यस्थितीतील राजकारण, महात्मा गांधीचे अहिंसाविषयक विचार आदी विषयांवर सादरीकरण केले.
परीक्षकांनी स्पर्धकांना चांगल्या प्रयत्नाबद्दल प्रोत्साहन देतांनाच अजून अधिक काय करता येऊ शकते, याविषयी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ लेखक तथा परीक्षक राजीव जोशी यांनी टीव्ही आपला गुरू असून त्यातून सातत्याने काहीतरी सांगितले जाते, हे मांडले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील एकांकिका, नाटके पाहिली पाहिजेत. विंगेतून होणाऱ्या हालचाली टिपतांना नजरेत एकांकिका असो वा नाटक साकारले गेले पाहिजे. नाटकाला एक ठराविक गती दिली गेली पाहिजे. जेणेकरून नाटक किंवा एकांकिका प्रेक्षकांच्या अंगावर जाईल. ती थेट भिडेल, असे त्यांनी सांगितले.
स्पर्धेविषयीही त्यांनी भूमिका मांडली. कोणत्याही विषयाचे सादरीकरण लोकसत्ता लोकांकिकेचे वैशिष्टय़े म्हणजे कोणताही विषय वर्ज्य नसणे. कुठलाही विषय घेऊन आपण थेट त्या विषयाला भिडू शकतो, हा विश्वास ही स्पर्धा देते. हेच या स्पर्धेचे वैशिष्टय़े आहे. परीक्षक म्हणून काम पाहतांना वेगळे काही पहातोय, याचे समाधान मिळते. एक वेगळा ताजेपणा या स्पर्धेत आहे. मुले वेगवेगळ्या विषयांची मांडणी नाविन्यपूर्ण पध्दतीने करत आहेत. याचाच अर्थ मुले स्वतला सिध्द करू पाहत आहेत. ही उत्सुकता, शिकण्याची उर्मी त्यांना पुढे घेऊन जाईल. वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होतांना इतिहासाची पाने चाळली गेली. त्यामध्ये गांधीजींच्या अहिंसा विषयासह समाज माध्यमांचा आपल्या जीवनावरील परिणामांवरही बोट ठेवण्यात आले. स्पर्धकांना मार्गदर्शन मिळाले तर ते नक्कीच पुढे जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परीक्षक हेमा जोशी यांनी स्पर्धकांना अभिनयात आवाजाला असणारे महत्व, संवादानुसार आवाजातील चढ उतार, संगीत, नेपथ्य रचना, प्रकाश योजना याविषयी मार्गदर्शन केले. रंगीत तालमीत वेळेचे नियोजन होणे गरजेचे आहे. जेणे करून एकांकिका असो किंवा नाटक, वेळेत पूर्ण होईल. ब्लॅक आऊटचा योग्य वेळी वापर, एखादे विधान किंवा विचार मांडतांना त्याचवेळी त्याच्याशी संबंधित काही प्रसंगही मांडता आले पाहिजे, अशी सूचना हेमा जोशी यांनी केली. विद्यार्थ्यांच्या विचार पध्दतीचा वेगळा अनुभव लोकसत्ता लोकांकिकेसाठी परीक्षणाचा अनुभव वेगळा आहे. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, त्यांची विचार पध्दती, राजकीय घडामोडीविषयी त्यांना असणारी समज लक्षात आली. वेगवेगळे संदर्भ वापरत ते त्यावर व्यक्त होऊ पाहत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. अगदी लोकशाही म्हणजे काय, सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याचे स्थान अधोरेखीत करण्याचा प्रयत्न ही तरूणाई करत आहे. वेगवेगळे विषय हाताळण्यात आले. सर्व विषय उत्तमरित्या मांडण्यात आले. सादरीकरणही उत्तम राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेसाठी उपस्थित आयरिस प्रॉडक्शनचे विशाल कदम यांनी विषयांची सफाईदार मांडणी लोकांकिकेच्या निमित्ताने महाविद्यालयीन नाटय़कर्मी व्यक्त होत आहेत, असे सांगितले. आजच्या पिढीचा आजूबाजूच्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन फार वेगळा आहे. ते त्यांचे सामाजिक भान टिकवून आहेत. एकांकिकेमधून अनेक विषय सफाईदारपणे मांडले जात असतांना त्यातून संदेश देण्याचा किंवा त्या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होत आहे. समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचे पडसाद लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत पहायला मिळत आहेत, ही खरंच फार सुखद गोष्ट आहे.
तरूणांच्या उर्जेला लोकांकिकेच्या माध्यमातून योग्य दिशा मिळाली आहे. यातून उद्याचे कलाकार घडतील, अशी आशा व्यक्त केली. विविध कोरगावकर यांनीही नवीन पिढी सजग नवीन गुणवत्ता समोर येत नसल्याची तक्रार करणाऱ्या लोकांसाठी लोकसत्ता लोकांकिका हे उत्तर असल्याचे सांगितले. आजची पिढी उर्जा, जोश, जल्लोश आणि चोख सादरीकरणाला महत्व देत आहे. लोकसत्ता लोकांकिकेमुळे हे समीकरण दिवसागणिक घट्ट होत आहे.
ही पिढी अधिक सजग असून मिळालेल्या संधीचे सोने करते, हे लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेने दाखवून दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रायोजक
लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक् शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.