राज्य परिवहनचा चित्ररथ नाशिक दौऱ्यावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस राज्यातील खेडय़ा-पाडय़ांपासून शहर परिसरात ७१ वर्षांपासून दिमाखात धावत आहे. बेडफोर्ड पासून सुरू झालेला हा प्रवास रातराणी स्लिपपर्यंत येऊन थांबला आहे. या बदलाची धावती सफर प्रवाशांसह आजच्या पिढीला व्हावी यासाठी राज्य परिवहन आणि बस फॉर अस फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘लाल परीचा प्रवास’हा चित्ररथ सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. मंगळवारी चित्ररथाने मालेगाव येथे मुक्काम केला.

राज्य परिवहनची सेवा १२ विभागात प्रवाशांना मिळत असून वाढत्या महागाईत आवडेल तिथे प्रवास, मासिक सवलत, ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात असणारी सवलत अशा आकर्षक योजनांसह सुरक्षित प्रवासाची हमी यामुळे आजही प्रवाशांची पसंती राज्य परिवहनच्या ‘लाल परी’ला असते. ‘बस फॉर अस’ च्या १२ युवकांनी एकत्र येत ‘लाल परीचा  चित्रप्रवास ’ हा चित्ररथ तयार केला असून राज्य परिवहनच्या स्थापनेपासून आजपर्यंत लाल परीत झालेले बदल, तिचा इतिहास संकलित करण्यात आला.

छंदातून एसटीचा प्रचार करणे तसेच एसटी बद्दलची नागरिकांच्या मनातील नकारात्मकता दूर करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बस फॉर अस फाउंडेशनचे रोहित धांडे यांनी दिली.

चित्ररथात बसच्या चित्रकृतीसह प्रतीकृती आकर्षकरित्या  मांडण्यात आल्या आहेत. तसेच राज्य मार्ग परिवहनने प्रवाश्यांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती, एसटीची कालानुरूप बदललेली बांधणी, आजच्या बस स्थानकांचे स्वरूप, ब्रीदवाक्य यांनी चित्ररथाची बाहेरील बाजू सजली आहे. स्थानकावरील प्रवाश्यांचा प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, प्रदर्शनामध्ये मांडलेल्या लालपरी, शिवशाही स्लीपर, विठाई, रातराणी स्लीपर या गाडय़ांच्या आकर्षक प्रतिकृती लहानग्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सोबतच एसटीच्या प्रतिकृती असणारे मग, की-चेन, बॅच इत्यादी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

लालपरी पुन्हा नव्या रुपात

राज्य परिवहनच्या एसटीला शहराची रक्तवाहिनी म्हटले जाते.  याच एसटीची ओळख लहानमोठय़ांना व्हावी म्हणून हा कार्यRम राबविण्यात आला आहे. अ‍ॅल्युमिनियमऐवजी एसटीसाठी आता माईल्ड स्टीलचा वापर करण्यात येत आहे. हे नवीन रूप नागरिकांपर्यंत पोहचेल. एसटीने स्पर्धेत उतरावे तसेच टिकावे यासाठी अशा उपRमांची आवश्यकता आहे.

– एम. एस. कुवर (अभियंता)

लालपरीची अभ्यासपूर्ण माहिती

आम्ही रोज प्रवास करतो. त्या लालपरीच्या इतिहासाची या प्रदर्शनातून माहिती झाली. एसटीमध्ये दर वेळेस होणारे नवीन बदल एकाच ठिकाणी बघता आले.

– नीलेश ढिकले (विद्यार्थी)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exhibition unfolded the journey of maharashtra state road transport corporation zws
First published on: 31-07-2019 at 02:06 IST