आवक घटल्याने भाजीपाल्याचे भाव वधारले

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत व्यापारी, कामगार, हमाल असे करोनाचे १० रुग्ण सापडल्याने कृषिमालाची आवक अकस्मात कमी झाली आहे.  परिणामी,भाजीपाल्याचा भाव वाढला आहे.

नाशिक बाजार समितीत भाजीपाला आणि फळांचे प्रामुख्याने व्यवहार होतात. मुंबईसह उपनगरे, गुजरात तसेच इतर भागात व्यापारी येथून कृषिमाल पाठवितात. जिल्ह्य़ातील बहुतांश भाजीपाला या बाजारात येतो. टाळेबंदीत समितीमध्ये आवक सुरळीत होती. तीन आठवडय़ांपूर्वी बाजारातील काही घटकांना करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाल्यानंतर चित्र बदलले. व्यापारी, हमाल, कामगार अशा एकूण १० जणांना करोनाची लागण झाली आहे. मे अखेरीस बाजार समिती तीन दिवस बंद ठेवण्यात आली. स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्यात आले. समितीचे व्यवहार पूर्ववत करतांना गर्दी होणार नाही, बाजारात येणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण आदी व्यवस्था करण्यात आली. मुख्य आवारातील किरकोळ विक्री बंद करून ती अन्य आवारात स्थलांतरीत केली गेली. सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजना करूनही बाजारात अपेक्षित प्रमाणात आवक होत नसल्याचे चित्र आहे. समितीने दिलेल्या माहितीनुसार सध्या फळभाज्या, पालेभाज्या आणि तत्सम कृषिमालाची साधारणत: सात हजार क्विंटलच्या आसपास आवक होत आहे. यामध्ये सुमारे साडेतीन हजार क्विंटल भाजीपाला असतो. नेहमीच्या तुलनेत आवक बरीच कमी झाल्याचे बाजार समितीने मान्य केले.

करोनाच्या भीतीमुळे अनेक शेतकरी बाजारात भाजीपाला नेण्याचे टाळतात. काही व्यापारी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा माल खरेदी करतात. याचा परिणाम बाजार समितीतील आवकवर झाल्याचे सचिव अरूण काळे यांनी सांगितले. सध्या भाजीपाल्याचे भाव वाढण्यामागे ते एक कारण आहे. गेल्यावर्षी पाऊसमान चांगले होते. त्यामुळे सर्वत्र पाण्याची उपलब्धता आहे. भाजीपाल्याचे उत्पादन चांगले असूनही बाजारात माल कमी प्रमाणात येत आहे. आवश्यक ती खबरदारी घेऊन बाजारात आजही हजारो क्विंटलचे व्यवहार होतात. मुखपट्टी परिधान करणे, लिलावावेळी सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घेतली जाते. यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घेऊन कृषिमाल बाजारात विक्रीला आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती संपत सकाळे यांनी केले आहे.

ग्राहकांना भाववाढीचे चटके

किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर कमालीचे वधारले आहेत. कोणतीही भाजी ५० ते १०० रुपये किलोच्या आतमध्ये नाही. गिलके, दोडके, ढोबळी मिरची, भेंडी ८० रुपये, तर फरसबी १२० रुपयांच्या घरात आहे. बाजार समितीतील क्विंटलचे दर पाहिल्यावर याचे कारण स्पष्ट होते. घाऊक बाजारात वांगी (प्रति क्विंटल) ३५००, टोमॅटो १६२५, कोबी १२८५, ढोबळी मिरची ४६२५, भोपळा २०००, कारले २९१५, दोडके ४५८५, काकडी १६२५, कांदा ८५०, लसूण आठ हजार रुपये, बटाटा १८५० असे दर आहेत. घाऊक बाजारात आवक घटल्याची झळ अखेरीस ग्राहकांना भाववाढीतून सहन करावी लागत आहे.