देवळा येथे शेतकऱ्यांचे आंदोलन
देवळा : देशांतर्गत बाजारात प्रचंड आवक होऊन कांद्याचे दर कमालीचे घसरत असल्याने निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी सोमवारी शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी, प्रहार शेतकरी संघटना यांच्यावतीने विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
दोन महिन्यांपूर्वी १० हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडणारा कांदा आता दीड हजार रुपयांवर आला आहे. देशांतर्गत बाजारात कांद्याचे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी घातली. स्थानिक बाजारात कांद्याची आवक वाढल्यानंतरही निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतला गेलेला नाही. निर्यातबंदी हटविल्यास देशांतर्गत बाजारात भाव स्थिर होण्यास हातभार लागणार आहे.
केंद्र सरकारने नुकताच आंध्र प्रदेशातील केपी कांद्याला निर्यातीची परवानगी दिली आहे. सर्वाधिक कांद्याचे राज्यात उत्पादन होते. एका राज्यातील कांद्यास परवानगी आणि दुसऱ्या राज्यातील प्रश्नाकडे दुर्लक्ष करत सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याची भावना आंदोलकांनी बोलून दाखविली. देवळा परिसरातील पाचकंदील भागात शेतकरी रस्त्यावर उतरले. पुढील काळात ५० लाख मेट्रिक टन कांदा विक्रीला येणार आहे. निर्यातीवरील बंदी न हटविल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतील.
सध्या मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्च भरून निघत नाही. कांदा भावातील घसरण रोखण्यासाठी निर्यातीला चालना देण्याचे धोरण स्वीकारावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन संबंधितांनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, कृष्णा जाधव, कुबेर जाधव, कुणाल शिरसाट आदींनी तहसीलदार दत्तात्रय शेजूळ आणि पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना दिले.