सटाणा पोलीस ठाण्यासमोर महिला ठेवीदारांचा पाच तास ठिय्या
गुंतवणुकीच्या नावाने शेकडो ठेवीदारांना कोटय़वधीला गंडा घालणाऱ्या मैत्री कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी संतप्त महिला ठेवीदारांनी सटाणा पोलीस ठाण्यासमोर पाच तास ठिय्या दिला.
मैत्री सुवर्णसिद्धी कंपनीने मालेगाव, कळवण, देवळा व बागलाण या तालुक्यांसाठी सटाणा शहरात मध्यवर्ती कार्यालय सुरू केले. विविध योजनांच्या गुंतवणुकीतून चांगला मोबदला मिळेल, या अपेक्षेने गरीब, कष्टकरी, नोकरदारांनी ठेवीच्या माध्यमातून हजारो रुपयांची गुंतवणूक केली होती.
ठेवींची मुदत संपल्याने अनेक गुंतवणूकदारांनी मध्यवर्ती कार्यालयात हेलपाटे मारले. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. मुदत संपलेल्या ठेवीदारांनी कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते बंद झाल्याचे लक्षात आल्यावर संतप्त झालेल्या दीडशे ते दोनशे महिलांनी सटाणा पोलीस ठाण्याकडे आपला मोर्चा वळवला. संबंधित कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी ठेवीदारांशी चर्चा करून ठेवींबाबत कागदपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या. कायदेशीर बाबी तपासून गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर तब्बल पाच तासानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, आतापर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारीवरून मैत्री सुवर्णसिद्धी कंपनीने सटाणा तालुक्यातील ५९४ ठेवीदारांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केली. या संदर्भात चित्र सिनेमा गृहाचे व्यवस्थापक राकेश सैंदाणे यांनी तक्रार दिली. कंपनीचे संचालक लक्ष्मीकांत नार्वेकर व विजय तावरे यांनी संगनमत करून २०१३ ते १६ या कालावधीत ठेवीदारांना सोन्याचे व व्याजाचे आमिष दाखवून सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.