आज ‘ओपन’ आणि ‘क्लोज’ चा (मटका) आकडा कोणता.. आम्ही पैसे भरूनही भ्रमणध्वनीचे रिचार्ज का झाले नाही.. घरचे गॅस सिलिंडर पाठवायला वेळ का लावता, अशा शेकडो प्रश्नांचा भडीमार सुरू असताना दुसरीकडे कोणी शिव्यांची लाखोली वाहते तर कोणी गंमत म्हणून त्रास देते. ही स्थिती आहे अग्निशमन दलाच्या ‘१०१’ या आपत्कालीन मदतवाहिनीची.
या मदतवाहिनीवर संपर्क साधण्याची मोफत व्यवस्था असल्याने दररोज थोडेथोडके नव्हे, तर तब्बल अडीच हजार दूरध्वनी येतात. त्यातील केवळ पाच ते दहा कामाचे असतात. उर्वरित बहुतेक दूरध्वनींचा केवळ त्रास देण्याचा उद्देश असल्याने येथील कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्याावर विपरित परिणाम होत आहे. या प्रकारे सातत्याने त्रास देऊन असुरी आनंद घेणाऱ्या दूरध्वनी क्रमांकाची यादी अग्निशमन दलाने अनेकदा पोलिसांकडे सोपविली. परंतु, त्यावर कारवाई होत नसल्यामुळे सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अहोरात्र तत्पर असणारे हे दल स्वत: हतबल झाले आहे.
आगीच्या घटना, नैसर्गिक आपत्ती वा तत्सम संकटात मदतीसाठी महापालिकेच्या अखत्यारीतील अग्निशमन दलाशी १०१ क्रमांकावर कोणालाही मोफत संपर्क साधता येतो. एकाचवेळी अनेकांना संपर्क साधता यावा म्हणून दलाने या क्रमांकाच्या पाच स्वतंत्र वाहिन्या कार्यरत ठेवल्या आहेत. या दलाच्या मुख्यालयात कार्यरत नियंत्रण कक्षात दूरध्वनीवरून येणाऱ्या तक्रारींवरून तत्परतेने आवश्यक ती कार्यवाही केली जाते. संकटसमयी मदतीसाठी पोलिसांच्या १०० या मदतवाहिनीनंतर सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असणारा १०१ क्रमांक आहे. आपत्कालीन मदतीसाठी कार्यरत असणाऱ्या या मदत वाहिनीवर वारंवार दूरध्वनी करत काही घटकांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा उद्योग सुरू केला आहे. यामुळे दलातील कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
या मदत वाहिनीवर येणारे दूरध्वनी विविध प्रकारचे असतात. कोणी रात्री-बेरात्री संपर्क साधून शिवराळ भाषेचा वापर करतात. मटक्याचे भाव विचारण्यासाठी अनेक जण दूरध्वनी करतात. एका खासगी भ्रमणध्वनी कंपनीचा क्रमांक मदत वाहिनी क्रमांकाशी साधम्र्य साधणारा असल्याचा नाहक त्रास दलास सहन करावा लागतो. रिचार्ज का झाले नाही, आमच्या ‘बॅलन्स’मधून परस्पर पैसे कसे ‘कट’ केले असे भ्रमणध्वनीशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. त्यांना उत्तर देताना कर्मचाऱ्यांची दमछाक होते. काही महिला गॅस सिलिंडर का आले नाही, याची विचारणा करतात. कोणी केवळ वेळ घालविण्यासाठी गंमत म्हणून या क्रमांकावर संपर्क साधतात. त्रास देण्यासाठी दूरध्वनी करणाऱ्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरूषांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. संपर्क साधणाऱ्यांशी ‘नमस्कार, अग्निशामक दल’ असा सौजन्यशील सूर लावण्याचा वरिष्ठांचा आदेश आहे. आपण नमस्कार केल्यानंतर समोरील व्यक्ती शिव्यांची लाखोली वाहत असल्याने मनस्वास्थ्य बिघडते. नियमित दूरध्वनी करून त्रास देणाऱ्या दूरध्वनी क्रमांकाची यादी या दलाने तयार करून भद्रकाली पोलीस ठाण्याकडे सोपविली. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करूनही आजतागायत काही झाले नसल्याची व्यथा दलातील कर्मचाऱ्यांनी मांडली. या संदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.