नाशिक: इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील शेतकऱ्यांच्या शिवारात उभ्या केलेल्या उसाच्या मोळय़ांमुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन निर्माण झालेल्या आगीत सुमारे १२ लाखांचा ऊस जळून खाक झाला. विद्युत वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मुकणे शिवारातील नारायण राव, गोपाळ राव, किसन राव, भाऊसाहेब राव या शेतकऱ्यांनी शेतातील उसाची कापणी झाल्यानंतर शेतातच उसाच्या मोळय़ा उभ्या करुन ठेवल्या होत्या. सोमवारी सायंकाळी या मोळय़ा वीज तारांना लागल्याने तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. निर्माण झालेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचा ऊस खाक झाला. उसाचे गाळप झाल्यानंतर मिळणाऱ्या पैशांवर शेतकऱ्यांचा वर्षभराचा घरखर्च अवलंबून असतो. शेतकऱ्यांकडून साखर कारखान्यांनी पीक नेण्यात चालढकल केली असताना त्यात महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे हाताशी आलेले पीक खाक झाले. या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनी आणि साखर कारखाना प्रशासन यांनी भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.