शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू असताना आजही ग्रामीण विशेषत आदिवासीबहुल भागातील बहुतांश विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत ‘व्हच्र्युअल शिक्षण पद्धती’ त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी नेचर क्लब ऑफ नाशिक आणि दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने पेठ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खारपडी या पाडय़ावरील जिल्हा परिषदेची शाळा ‘डिजिटल’ करण्यात आली. आगामी शैक्षणिक वर्षांत याच परिसरातील जिल्हा परिषदेच्या तीन शाळा ‘डिजिटलाइज’ करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
पेठ तालुक्यातील खारपडी पाडय़ावरील जिल्हा परिषदेच्या शाळेचे अस्तित्व केवळ फलकापुरते राहिले होते. इयत्ता पहिली ते चौथीची पटसंख्या ही ४० असताना प्रत्यक्ष हजेरीचा विचार न केलेलाच बरा. दोन इयत्ता मिळून एक वर्ग भरतो. तिथे शिक्षकही शिकवण्यास तयार नाही. या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणक, एलइडी यासह अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज अशी ‘व्ह्च्र्युअल क्लास रूम’ कधी त्यांच्या गावीही नाही. नेचर क्लबने शाळेचे रूप बदलण्यासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पहिल्या डिजिटल स्कूलचे उद्घाटन विद्यार्थिनी गौरी भोये हिच्या हस्ते करण्यात आले. शाळेत पहिली ते चौथीचे विद्यार्थी या सर्व अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करणार आहेत. या वेळी विस्तार अधिकारी पिंगलकर, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, गावचे सरपंच पार्वता आसम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास भोये, चेतन राजापूरकर आदी उपस्थित होते. क्लबच्या वतीने शाळेच्या भिंती कार्टून, नकाशे, विविध माहितींनी रंगविण्यात आल्या तर जमिनीवर खेळातून शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. संगणकाचे ज्ञान मुलांना व्हावे यासाठी एलसीडी स्क्रीन, संगणक, डिजिटल सिल्याबस, प्रिंटर आदी साहित्य देण्यात आले. पाडय़ावरील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत आदिवासी नृत्याच्या सादरीकरणातून केले. विद्यार्थ्यांनी निर्मिलेले विविध प्रयोग समजावून सांगितले.
तसेच शाळेत गड-किल्ल्यांचे प्रदर्शनदेखील भरविण्यात आले. गावातील ज्येष्ठ पावरी वादक जयराम काकड यांचा सत्कार करण्यात आला. मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत नृत्य, गायन, हस्त, चित्रकला आदींचा आविष्कार घडविला. शाळेचे रूपडे बदलण्यासाठी चेतन राजापूरकर, किशोर वडनेरे, सागर घोलप आदी प्रयत्नशील होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदिवासी पाडय़ावरील मुले असली तरी त्यांच्यात शिकण्याविषयी प्रचंड आस्था आणि उत्सुकता आहे. त्यांना बदलत्या काळानुरूप ‘डिजिटल’ अभ्यास समजावा, शिक्षक वर्गात नसले तरी स्क्रीनवर तो अभ्यास सुरू राहावा, त्याचे प्रात्यक्षिक समजावे यासाठी डिजिटल क्लासरूमची संकल्पना येथे राबविली. यामुळे विद्यार्थ्यांची आकलन आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. शिवाय अभ्यासाची गोडी निर्माण होईल. भविष्यात पुढील शिक्षणासाठी शहराकडे येत असताना संगणकीय ज्ञानासह इंग्रजी भाषेचा वापर ते लीलया करू शकतात. आगामी शैक्षणिक वर्षांत परिसरातील तीन शाळांचे रूप बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
– प्रा. आनंद बोरा (अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First digital school in nashik
First published on: 03-05-2016 at 02:36 IST