नाशिक : येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर मंगळवारी कार्यकारी मंडळासाठी होणाऱ्या मतमोजणीकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागून होते. परंतु, मतमोजणीच्या संथपणामुळे रात्री उशीरापर्यंत एकही निकाल जाहीर करण्यात आला नाही. मतमोजणीत ग्रंथालय भूषण पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते
सावानाच्या पंचवार्षिकासाठी रविवारी मतदान झाले. तीन हजार ९०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची मतमोजणी झाली. ग्रंथालय भूषणचे उमेदवार प्रा. दिलीप फडके हे अध्यक्षपदी तर, प्रा, सुनील कुटे आणि वैद्य विक्रांत जाधव हे उपाध्यक्षपदी निवडून आले. मंगळवारी सकाळी वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात कार्यकारी मंडळाच्या १५ जागांसाठी मतमोजणी सुरु झाली. सायंकाळी पाच वाजता पहिली फेरी पार पडली. यामध्ये ग्रंथालय भूषण पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. एक हजार मतदारांची एक अशा चार फेऱ्या घेण्यात येणार होत्या. पहिल्या फेरीच्या वेळी १२ पेटय़ा खोलण्यात आल्या. त्यावेळी बहुतांश पत्रिका कोऱ्या होत्या.
काहींवर खाडाखोड तर काही पत्रिकांवर लिहिण्यात आले होते. अशा ३३३ पत्रिका बाद ठरल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी योगिनी जोशी यांनी दिली. सायंकाळी पाचनंतर दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु झाली. रात्री उशिरापर्यंत एकही निकाल जाहीर झालेला नव्हता.
दुसऱ्या दिवशीही वाद
सार्वजनक वाचनालय नाशिकच्या कार्यकारी मंडळ सदस्यांच्या मतमोजणीत पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही वाद झाला. दुसऱ्या फेरीतील मतमोजणीत ग्रंथालय भूषण पॅनलच्या उमेदवार प्रेरणा बेळे यांच्या प्रतिनिधींनी मतमोजणी दरम्यान दुसऱ्या पॅनलच्या उमेदवारांकडून आक्षेपाह्र्य वर्तन होत असल्याचे सांगितल्याने मतमोजणी रोखण्यात आली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगिता जोशी यांच्यासह पोलिसांनी हस्तक्षेप करत वादावर पडदा टाकला. यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First round library bhushan lead savannah executive membership election amy
First published on: 11-05-2022 at 00:04 IST