scorecardresearch

नाशिक : आता युद्धाधारित कामगिरीवर प्रकाश, तोफखाना संग्रहालयाच्या अंतरंगात बदल

नाशिकरोड येथील तोफखाना दलाच्या संग्रहालयात दीड दशकानंतर अनोख्या पद्धतीने बदल होत आहे.

Artillery Museum nashik
संग्रहालयात जतन केलेल्या दुर्मीळ तोफा (image – loksatta team/graphics)

नाशिक – भारतीय तोफखान्याच्या देशातील सर्वात जुन्या व विशाल संग्रहालयाचे अंतरंग बदलून युद्धनिहाय कामगिरीवर प्रकाशझोत टाकण्याची रचना करण्यात येत आहे. प्रत्येक युद्धात वापरलेल्या तोफा व अन्य शस्त्रास्त्रे, दारुगोळा, कामगिरीबद्दल मिळालेली शौर्य पदके या स्वरुपात मांडणी लवकरच पहावयास मिळणार आहे. या संदर्भात त्रिमितीय प्रतिकृती आणि दृकश्राव्य माध्यमातून माहिती मिळेल. शिवाय, भेट देणाऱ्यास बारकोड स्कॅन करून भ्रमणध्वनीवर संग्रहालयाचा डिजिटल परिचय करून देण्यात येणार आहे.

नाशिकरोड येथील तोफखाना दलाच्या संग्रहालयात दीड दशकानंतर अनोख्या पद्धतीने बदल होत आहे. आधीची रचना एकत्रित स्वरुपाची होती. त्याची युद्धनिहाय विभागणी प्रगतीपथावर आहे. कुठल्याही युद्धात तोफखाना उतरतो, तेव्हा त्याचे स्वरुप पूर्णत: बदलून जाते. याची प्रचिती संग्रहालयातील ऐतिहासिक ते आजवरच्या तोफांच्या स्थित्यंतरातून येते. या ठिकाणी अतिशय दुर्मीळ खजिना आहे. मराठा साम्राज्यातील सात ते आठ तोफा, मुघलकालीन जमजमा, १८०० व्या शतकात राजपूत साम्राज्यातील सोन्यासह पंचधातूंची अवाढव्य समरबान यांचा समावेश आहे. टिपू सुलतानच्या काळातील १०२ बॅरलची दुर्मीळ रतनबान येथे आहे. आज तोफखाना दल एकाचवेळी ४० रॉकेट डागणाऱ्या मल्टीबॅरल रॉकेट लाँचरचा वापर करते. त्याच्या भडिमाराने शत्रूला पळण्याची संधी न मिळता तळ उद्ध्वस्त होतो. त्या काळात १०२ बॅरलच्या तोफेद्वारे तोच विचार झाल्याकडे सहायक क्युरेटर सुभेदार जितेंद्र सिंग (निवृत्त) लक्ष वेधतात.

हेही वाचा – भाईंदरमध्ये जन्मदाखल्यासाठी मालमत्ता कराचा भरणा बंधनकारक; करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेचा निर्णय

संग्रहालयात पहिल्या व दुसऱ्या महायुद्धातील तोफा व रणगाडे, युद्धात वापरलेली विविध सामग्री, भारतीय हवाई दलाचे विमान, तोफांसाठी वापरला जाणारा दारुगोळा, तोफखान्याची स्थित्यंतरे, विविध युद्धात प्राप्त झालेले शौर्य पुरस्कार, डोंगराळ प्रदेशातील तोफखाना, अलीकडच्या काळात समाविष्ट झालेल्या क्षेपणास्त्रांच्या प्रतिकृती आदींचा अंतर्भाव आहे. यांचे प्रत्यक्ष अवलोकन करता येते. जोडीला तोफखाना दलाचा प्रवास ध्वनी व प्रकाश योजनेच्या विलक्षण प्रयोगातून बघता येतो. नव्या रचनेत संग्रहालयाची अंतर्गत रचना आता पहिले महायुद्ध, द्वितीय महायुद्ध, १९४७-४८ मधील भारत-पाकिस्तान संघर्ष, १९६२ भारत-चीन, १९६५, १९७१ व १९९९ मधील भारत-पाकिस्तान युद्ध अशी बदलणार आहे. आधीच्या रचनेत दारुगोळा, शस्त्र, शौर्य पदके त्या त्या विभागात एकाच ठिकाणी होते. नव्या रचनेत युद्धनिहाय त्यांचे वर्गीकरण होईल.

बोफोर्स तोफांचा १९९९ च्या कारगिल युद्धात पहिल्यांदा वापर झाला होता. त्यामुळे ती तोफ संग्रहालयातील १९९९ च्या युद्धाच्या विभागात समाविष्ट होईल. प्रत्येक युद्धात मिळालेल्या शौर्य पुरस्कारांची रचना त्याच अनुषंगाने केली जाणार आहे. संग्रहालयास भेट देणाऱ्यांना टॅबवर माहिती देण्याची व्यवस्था होती. नव्या रचनेत त्रिमितीय प्रतिकृती व दृकश्राव्य माध्यमातून माहिती देण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी प्रत्येक विभागात दृकश्राव्य पडदे (स्क्रिन) लावण्यात येणार आहेत. भ्रमणध्वनीवर डिजिटल माध्यमातून माहिती देण्याचे नियोजन आहे. सध्या संग्रहालयास महिनाभरात तीन ते चार हजार शालेय विद्यार्थी व नागरिक भेट देतात. नुतनीकरणाचे काम तीन महिन्यांत पूर्णत्वास जाणार आहे. तेव्हा संग्रहालय नव्या धाटणीने सर्वांसमोर येईल, असा विश्वास लेफ्टनंट कर्नल एस. के. पांडा यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण; फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठी महापालिकेची पावले

जवळपास दीड दशकानंतर तोफखाना संग्रहालयाचे नुतनीकरण केले जात आहे. पूर्वी तोफांची माहिती, छायाचित्र, लष्करी सामग्री वेगवेगळी होती. आता युद्धावर आधारीत विभाग केले जातील. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरच्या युद्धात तोफखाना दलाची कामगिरी अधोरेखित केली जाणार आहे. तोफखाना दल काय आहे, त्याचे महत्व, इतिहास याची सर्वांगीन माहिती नेटक्या पद्धतीने संग्रहालयात मिळणार आहे, असे ब्रिगेडिअर ए. रागेश ( तोफखाना केंद्र, नाशिकरोड) म्हणाले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 09:46 IST