नाशिक – महात्मानगरमधील वनविहार कॉलनीत बिबट्याने शुक्रवारी दुपारी धुमाकूळ घालत सहा जणांना जखमी केले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सायंकाळी बिबट्याला बेशुध्द करत ताब्यात घेण्यात वन विभागाला यश आले. या घटनाक्रमाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करताना बघ्याच्या गर्दीमुळे तो अधिक आक्रमक झाला होता. या घटनाक्रमानंतर वन विभागाच्या पथकांनी रात्री परिसरात जनजागृती गस्त घालत नागरिकांना मार्गदर्शन केले.
जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागाप्रमाणे शहरात बिबटे मुक्त संचार करू लागल्याचे दिसत आहे. गुरुवारी शिवाजीनगर भागात बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. दुसऱ्याच दिवशी येथून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बन विहार कॉलनी, कामगारनगर भागात बिबट्याने धुमाकूळ घातला. रस्त्यावरील काही नागरिकांवर हल्ला चढविला.
गर्दी, आवाज यामुळे बिबट्या बिथरला आणि तो सैरावैरा पळू लागला. गोंधळामुळे बचाव कार्यात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. एका घरामागील मोकळ्या जागेत इंजेक्शन डागून बिबट्याला बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत वन रक्षक संतोष बोडके, प्रवीण गोलाईत हे जखमी झाले.तर तुषार आचारी, बबन शिंदे, रंगनाथ दाबल व राहुल देवरे हे चार नागरिक जखमी झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. जेरबंद झालेला बिबट्या नर असूुन तो दोन वर्षांचा आहे.
या घटनाक्रमानंतर पश्चिम नाशिक वन विभागाच्या पथकांनी रात्री कामगारनगर, गंगासागर कॉलनी, वन विहार कॉलनी, गंगापूर रोड, संत कबीरनगर परिसरात जनजागृती गस्त घातली. बिबट्याच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयी माहिती दिली. बिबट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो. त्यामुळे रात्री एकट्याने बाहेर भ्रमंती करणे टाळा. पायी फिरताना जवळ टॉर्च व काठी बाळगा. एकटे असताना भ्रमणध्वनीवर मोठ्या आवाजात गाणी लावा.
रात्रीच्या वेळी लहान मुले, वृद्धांना एकटे बाहेर पडू देऊ नका. आपले कुत्रा, बकरी, कोंबड्या आदी पाळीव प्राणी बंदीस्त व सुरक्षित जागी ठेवावेत. घराजवळ कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा. कोंबडे, मांस यांचे अवशेष घराजवळ फेकू नका. तसे न केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढेल आणि बिबट्या त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतो. घराजवळील गवत, पालापाचोरा स्वच्छ करा. रात्री अंगणातील दिवे सुरू ठेवा. अकस्मात बिबट्या दिसल्यास शांत रहाण्याचा प्रयत्न करा. त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे. त्याला डिवचण्याचा, पळवून लावण्याचा प्रयत्न बिल्कूल करू नका. तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
