शहरातील युवा संघटना व सामाजिक संस्था यांना एकत्र करून सनविवि फाऊंडेशनच्या वतीने जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधत रविवारी सकाळी शहरातील व्हिक्टोरिया (अहिल्याबाई होळकर पूल) या ब्रिटिशकालीन १२५ वर्षांच्या पुलास मैत्री बंधनात अडकवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या वेळी सनविवि फाऊंडेशन, युवान, विवेकवाहिनी, विद्यार्थी न्याय मंच, एकनिष्ठ युवा फाऊंडेशन, शिवकार्य गडकोट मोहीम, तालरुद्र ढोल पथक यांचे कार्यकर्ते एकत्र येऊन पुलावर मानवी साखळी तयार केली होती. १८९५ मध्ये इंग्रजांनी व्हिक्टोरिया पुलाची निर्मिती केली. गोदावरी नदीवरील हा पूल नाशिक आणि पंचवटी यांना जोडतो. गोदावरीचे अनेक महापूर या पुलाने अनुभवले आहेत. १२५ वर्षांपासून नाशिककरांची सेवा करणाऱ्या या पुलाशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.